PMPML भ्रष्टाचारावरून समाजवादी पार्टी आक्रमक:माहिती दडवणे, बेकायदेशीर पदोन्नतीचा आरोप, कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन
![]()
पीएमपीएमएल प्रशासनातील कथित भ्रष्टाचार, माहिती दडवणे आणि बेकायदेशीर पदोन्नती प्रकरणांवर समाजवादी पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या विरोधात पुणे शहर समाजवादी पार्टीने पीएमपीएमएल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पुणे शहर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष जांबुवंत मनोहर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर गंभीर आरोप केले. माहिती अधिकारांतर्गत मागवलेली माहिती वारंवार दडवली जात आहे, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे, तसेच बेकायदेशीर पदोन्नती आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनिस अहमद, साधना शिंदे, दत्ता पाकिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. माहिती अधिकारांतर्गत कारवाईची मागणी करणारी अनेक पत्रे प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, संबंधित विभागाकडून अद्याप समाधानकारक माहिती मिळालेली नसल्याचा आरोप पक्षाने केला आहे. प्रशासनाने बेकायदेशीर पदोन्नतीबाबत वेतनवाढ थांबविल्याचे मान्य केले असले तरी, संबंधित पदोन्नती अद्याप रद्द करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. कामगारांना तातडीने वैद्यकीय सुविधा आणि २५ हजार रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात यावी, तसेच अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया त्वरित राबवावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. सुरक्षारक्षक पदावरून कोणतीही आवश्यक शैक्षणिक पात्रता नसताना डेप्युटी अकाउंट ऑफिसर पदावर करण्यात आलेल्या पदोन्नतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्याचप्रमाणे, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या स्टॅण्ड मॅनेजर पदातील नियुक्त्यांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. पंकज देवरे, योगेश होले, ज्ञानेश्वर जाधव, प्रशासन अधिकारी किरवे आणि निवृत्ती भांडे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, बी. पृथ्वीराज (भाप्रसे) यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करण्याची मागणीही पक्षाने केली. समाजवादी पार्टीच्या वतीने पीएमपीएमएल कार्यालयासमोर ५ मे रोजी प्रस्तावित करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. आता हे आंदोलन मंगळवार, दिनांक १२ मे २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार असल्याची माहिती जांबुवंत मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणेकरांपासून सत्य लपवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाजवादी पार्टीने दिला आहे.
