![]()
वासिंबा बायपासवर राष्ट्रीय महामार्गावरील वणी रंभापूर उड्डाणपुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामासाठी नागपूरवरून थेट आणण्यात आलेली राख (फ्लाय ॲश) बोरगाव मंजू येथील वासिंबा बायपास आणि एमआयडीसी जवळील मोठ्या पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आली आहे. ही उघड्यावर साठवलेली राख आता परिसरातील नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या जीवावर उठली आहे.सध्या सुरू असलेल्या रखरखत्या उन्हात जोरदार हवा सुटल्यामुळे ही राख हवेत मोठ्या प्रमाणावर उडत आहे. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना आणि पादचाऱ्यांना बसत आहे.दुचाकी चालवताना अचानक डोळ्यांत राख गेल्यामुळे केव्हाही मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या राखेच्या प्रदूषणामुळे केवळ वाहनधारकच नव्हे, तर बायपासला लागून असलेल्या संपूर्ण रेणुका नगरातील रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. एकीकडे शासन स्वच्छ व सुरक्षित जीवनाचा दावा करत असताना, दुसरीकडे मात्र या प्रदूषणामुळे बोरगाव मंजूतील जीवनमान धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक महसूल प्रशासन, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन या राखेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. संबंधित विभागाने ही साठवलेली राख तातडीने उचलून न नेल्यास, त्रस्त नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र उपोषण करतील, असा इशारा बोरगाव मंजू येथील संतप्त जनतेने दिला आहे. नागरिकांना जडताहेत श्वसनाचे गंभीर आजार हवा सुटताच ही बारीक राख लोकांच्या घरांमध्ये शिरत असून, थेट खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये आणि पिण्याच्या पाण्यात जात आहे. यामुळे लहान मुलांच्या नाकात व घशात राख गेल्याने त्यांना श्वसनाचे गंभीर आजार जडत आहेत. शेतात काम करणारे मजूर, स्थानिक हॉटेल्सच्या किचनमध्येही राखेचे साम्राज्य पसरल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
वाशिंबा बायपासजवळील राखेमुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात:महसूल प्रशासनाने कार्यवाही करावी, स्थानिक नागरिकांची मागणी
