![]()
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत तालुक्यातील भैताणे दिगर येथील गायरान जमीन सौर प्रकल्पासाठी देण्यास सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि आदिवासी बांधवांनी कडाडून विरोध केला आहे. गायरान क्षेत्र गुरांच्या चरण्यासाठी, डोंगरादेव व इतर धार्मिक तसेच सार्वजन
.
भैताणे दिगरच्या सरपंच दीपाली कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी काश्मिरा संखे, तहसीलदार रोहिदास वारुळे आणि गटविकास अधिकारी रमेश वाघ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. लोकभावनेचा विचार करून सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
तहसीलदारांच्या १२ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये गट नं. ३३ मधील जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र, ग्रामसभेच्या ठरावाद्वारे ग्रामस्थांनी त्यास विरोध दर्शविला आहे. सदर जागा सार्वजनिक उपयोगासाठी तसेच भविष्यातील गावठाण विस्तारासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. गुरांच्या चरण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने पशुधनाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तसेच आदिवासी समाजाच्या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांसाठीही हीच जागा वापरली जात असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. गायरान क्षेत्रात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारा तसेच सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले आहे. महसूल आणि पंचायत समिती प्रशासनाने ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरपंच कोल्हे, सदस्य माया पवार, चंदर पवार, सुदाम भोये आणि ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. ग्रामस्थांचा विरोध डावलून जमिनीचा ताबा घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, गायरान जमिनीच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी एकमुखी भूमिका घेतल्याने या प्रश्नाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या नियोजित प्रकल्पासाठी पर्यायी जागा देण्यासही नकार गट नं. ८९ मधील १७.७३ हेक्टर क्षेत्रात सागवान लागवड आणि जलसंधारणाची कामे झाल्याने त्या जागेलाही विरोध. गट नं. १३२ मधील १.४८ हेक्टर क्षेत्र स्मशानभूमी असून, सातबाऱ्यावर ‘म्हसनवट’ अशी नोंद असल्याने ती जागाही नाकारली. दरम्यान, भेंडी आणि हिंगळवाडी येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित असून, तेथील शेतकऱ्यांचा वीजप्रश्न सुटल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
