42,680 जागांसाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू:पहिली यादी 14 मे रोजी, 19 पासून इनहाऊस कोटा, अल्पसंख्यकांनाही संधी

0
2736b13d-1166-4293-80d7-4b9311ebe259_1778426082386.jpg




दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये सुमारे ४२,६८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सोमवार, ११ मे पासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होत आहे, ज्याला ‘टप्पा दोन’ असे नाव देण्यात आले आहे. या टप्प्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या निवडीचा पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. दहावीचा निकाल दोन दिवसांपूर्वी घोषित झाला असून, अमरावती जिल्ह्यातील ३४,२०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचे अर्ज शाळांनी यापूर्वीच भरून घेतले होते, ज्याला ‘पहिला टप्पा’ म्हटले गेले. आता सोमवारपासून प्रवेशाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. काही विद्यार्थी आयटीआय आणि तंत्रनिकेतनकडे वळण्याची शक्यता असल्याने अकरावीच्या काही जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लगेच परीक्षा घेतली जात असल्याने त्यापैकी काही विद्यार्थी आणि गतवर्षी प्रवेश न घेऊ शकलेले काही विद्यार्थी यांच्यामुळे या रिक्त जागा भरून निघतील, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या टप्प्यानंतर १४ मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या यादीत कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी पसंती दर्शवलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. अमरावती जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८,३२० जागा आहेत, त्याखालोखाल कला शाखेच्या १८,२६० आणि वाणिज्य अभ्यासक्रमाच्या ६,१०० जागा आहेत. इनहाऊस कोटा (ज्या शाळेत विद्यार्थी शिकला, त्याच शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मागणारे विद्यार्थी), अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया १९ मे पासून सुरू होईल. त्यानंतर, २१ आणि २२ मे रोजी उर्वरित विद्यार्थ्यांना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त १० महाविद्यालयांचा पर्याय द्यावा लागणार आहे. या पर्यायांनुसार पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी २६ मे रोजी जाहीर केली जाईल. यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तीन दिवसांत प्रवेश घ्यावा लागेल. गरजेनुसार आणखी काही टप्पे वाढवले जातील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed