अमरावती विभागीय क्रीडा संकुलात कचऱ्याचे ढिग:खेळाडूंच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह, सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

0
7d6ecc47-b085-477a-8f0c-351b2c286d03_1778426161417.jpg




अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात काही ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. विशेष म्हणजे, हा कचरा संकुलाच्या आतील नसून तो बाहेरून आणून टाकण्यात आला आहे. यामुळे क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत वास्तव्यास असलेल्या खेळाडूंचे आणि सकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, येथील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या काही नागरिकांनीच संकुलातील कचऱ्याचा विषय समोर आणला. त्यांनी केलेल्या पाहणीत, क्रीडा संकुलासमोरच्या महामार्गालगतच्या काही दुकानांतील टाकाऊ वस्तू, फळांच्या साली आणि उसाची चरपटे या कचऱ्यात आढळून आल्या. हा कचरा संकुलात पोहोचला कसा, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. अमरावतीचे विभागीय क्रीडा संकुल हे पाच जिल्ह्यांसाठीचे मुख्य क्रीडा प्रशिक्षण केंद्र आहे. येथे विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच, काही दैनंदिन खेळ पीपीपी तत्त्वावर चालवले जात असल्याने सकाळी व सायंकाळी खेळणाऱ्यांची आणि फिरायला येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. संकुलातील कचऱ्याचे ढिग या सर्वांसाठीच अडचणीचे ठरले आहेत. सामान्यतः क्रीडा संकुल, शाळा किंवा रुग्णालये यांसारख्या ठिकाणचे वातावरण नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असते, अशी अपेक्षा असते. मात्र, अमरावती क्रीडा संकुलातील सद्यस्थिती या समजाला छेद देणारी आहे. क्रीडा संकुलातील स्वच्छतागृहांमध्येही घाणीचे साम्राज्य आहे. लघुशंकेसाठी गेल्यास तेथे इतका उग्र वास येतो की काही काळ थांबणेही अशक्य होते. नियमित स्वच्छता होत नसल्याने प्रसाधनगृहातील तळभाग निसरडा झाला आहे. अशा परिस्थितीत येथे प्रशिक्षण घेणारे खेळाडू कसे राहत असतील, हा एक गंभीर प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed