अमरावती जिल्हा परिषदेत बदली सत्र सुरू:चार विभागांतील 38 कर्मचाऱ्यांचे स्थानांतर; आरोग्य विभागाचा टप्पा बाकी
![]()
अमरावती: जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्रात चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात पूर्ण झाली. आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्या सोमवारी केल्या जाणार आहेत. बदली सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. सकाळी १० वाजता सुरू झालेली प्रक्रिया दुपारी थांबली. जनगणना सेवा नसलेल्या विविध विभागांतील वर्ग-क कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदल्यांचा यात समावेश होता. पहिल्या दिवशी महिला व बालविकास, कृषी, पशुसंवर्धन आणि वित्त व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महिला व बालविकास विभागात अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या ४ विनंती बदल्या झाल्या. पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदाच्या २ प्रशासकीय आणि १ विनंती बदली, तर पशुधन पर्यवेक्षक पदासाठी २ प्रशासकीय व ४ विनंती बदल्या करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात वित्त व लेखा विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाच्या १ प्रशासकीय व १ विनंती बदली झाली. तसेच, वरिष्ठ सहाय्यक लेखा पदाच्या २ प्रशासकीय, २ विनंती आणि १ आपसी विनंती बदली करण्यात आली. आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदाच्या १ प्रशासकीय व २ विनंती बदल्या, तर आरोग्य सेवक (पुरुष) पदाच्या ८ प्रशासकीय आणि ७ विनंती बदल्या झाल्या. आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारी पार पडणार आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) श्रीराम कुलकर्णी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी शिल्पा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) विलास मरसाळे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे उपआयुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, जिल्हा कृषी अधिकारी मल्ला तोडकर आदी अधिकारी उपस्थित होते. सहाय्यक प्रशासन अधिकारी निलेश तालन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीकांत मेश्राम व पंकज गुल्हाने यांच्यासह हेमंतकुमार यावले, सुजित गावंडे, सतीश पवार, राहुल रायबोले आणि निशांत तायडे यांनी बदली प्रक्रियेचे कामकाज यशस्वीरित्या सांभाळले.
