मोहोळ- वळसंग मार्गासाठी 740 कोटी मंजूर:आमदार सुभाष देशमुखांच्या 10 वर्षांच्या पाठपुराव्याला यश, दळणवळणाला मिळणार गती
![]()
सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणाऱ्या एनएच-४६५ अंतर्गत मोहोळ-बसवनगर (तेरा मैल)-वळसंग या ८१.३७ कि.मी. मार्गाच्या विकासासाठी ७४०.३८ कोटी रुपयांच्या निधीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी २०१४ पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यावर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्कामोर्तब केले असून, त्यांच्या पत्राने या कामाच्या श्रेयवादावर आता पडदा पडला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी २०१४ पासून या मार्गाच्या उन्नतीकरणासाठी केंद्र सरकारकडे अनेकदा निवेदने, पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून ७४०.३८ कोटींचा निधी पदरात पडला आहे. या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण तसेच आवश्यक त्या ठिकाणी पूल व इतर सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे सोलापूर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि वेगवान होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, या महामार्गाचे कोणतेही विस्तारीकरण होणार नाही किंवा जमिनी संपादित होणार नाहीत. हा दुहेरी मार्ग असल्याची सध्या चर्चा आहे. मात्र, आमदार सुभाष देशमुख यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रस्त्याचे रुंदीकरण व पुलांचा उल्लेख असल्याने, हा महामार्ग नेमका दुपदरी होणार की चौपदरी, याबाबत मोहोळ तालुक्यात तर्कवितर्क लावले जात आहेत. निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनी दिल्लीत नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेऊन सोलापूरकरांच्या वतीने आभार व्यक्त केले. गडकरींनी पत्राद्वारे या कामातील आमदारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विशेष उल्लेख केला आहे. या महामार्गावरील सय्यद वरवडे, कुरुल, कामती, कोरवली अशा ठिकाणची घातक वळणे सरळ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ही वळणे सरळ करून ‘अपघाताचे ब्लॅक स्पॉट’ कायमचे दूर होतील का, याकडे लक्ष लागले . ब्लॅक स्पॉट दूर होणार प्रगतीच्या दिशेने निर्णायक टप्पा ^या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमधील दळणवळण अधिक सक्षम व सुरक्षित होईल. औद्योगिक गुंतवणूक, कृषी वाहतूक व व्यापारी हालचालींना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला नवे बळ प्राप्त होईल. हा प्रकल्प सोलापूरच्या प्रगतीच्या दिशेने एक निर्णायक टप्पा ठरेल. — सुभाष देशमुख, आमदार
