पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला:मनमाडमध्ये नाशिकच्या तरुणाचा, तर अमरावतीत 'रील' बनवताना 4 जणांचा बुडून मृत्यू
![]()
उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी स्विमिंग पूल आणि तलावांवर पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच, दोन भीषण दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. मनमाडमध्ये लग्नासाठी आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला, तर अमरावतीमध्ये रील बनवण्याच्या नादात चार मुला-मुलींना तलावात जलसमाधी मिळाली. मातृदिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लग्नासाठी आला अन् काळाने ओढले; वाहतूक कोंडीमुळे उपचारात विलंब नाशिक येथील गणेश गायकवाड (३०) हा तरुण मनमाडमध्ये एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आला होता. लग्नाचा उत्साह असतानाच स्वि ही दुर्दैवी घटना घडली. शनिवारी सायंकाळी गणेश मित्रांसह शहरालगतच्या एका हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. पोहताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मित्रांनी त्याला तातडीने बाहेर काढून प्राथमिक उपचार दिले. वाहतूक कोंडीचा अडथळा गणेशला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना पुणे-इंदूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वेळ वाचवण्यासाठी काही तरुणांनी त्याला कारमधून उतरवून खांद्यावर घेऊन रुग्णालय गाठले. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अमरावती: ‘मातृदिनाला’च मातांच्या काळजाचे तुकडे हरपले अमरावतीमध्ये रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या मुलांवर काळाने झडप घातली. ‘डब्बा पार्टी’साठी गेलेल्या ८ ते ९ मुलांपैकी चौघांचा धातखेडा तलावात बुडून मृत्यू झाला. दुपारी जेवण आटोपल्यानंतर ही मुले तलावाकाठी रील बनवण्यासाठी आणि पोहण्यासाठी पाण्यात उतरली. एक मुलगा खोल पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेली १६ वर्षांची मुलगी आणि इतर दोन मुलेही एकामागून एक पाण्यात ओढली गेली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून चौघांचेही मृतदेह बाहेर काढले. मृतांमध्ये सोनाली नरेंद्र जोशी (१६), आदित्य नरेंद्र जोशी (१२), पायल बबलू पंडित (२१) आणि यश गजानन काकणे (१३) यांचा समावेश आहे. मातृदिनाच्या दिवशीच आपल्या मुलांच्या निधनाची वार्ता ऐकून मातांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. रील बनवण्याच्या वेडापायी तीन हसत्या-खेळत्या संसारांची राखरांगोळी झाली आहे.
