वनीकरण विभागाची 'झाडाझडती'!:वृक्षारोपणातील गैरव्यवहारावरून जिल्हाधिकारी घेणार यंत्रणेची हजेरी, कागदपत्रांचीही होणार तपासणी
![]()
कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या कामांवरून आता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून यंत्रणेची हजेरी घेतली जाणार आहे. या कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन कागदपत्रांची तपासणी देखील केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता वनीकरण विभागाचे गैरकारभार चव्हाट्यावर येणार असल्याचे बोलले जात आहे. कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपन कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र चौकशी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भुते यांनी सामाजिक वनीकरण विभागाला वारंवार पत्र देऊन तसेच नोटीस देऊनही त्यांनी कामांची कागदपत्रे सादर केली नाही. तब्बल पाच वेळा पत्र दिल्यानंतरही कागदपत्रे मिळाली नसल्याने उपविभागीय अधिकारी भुते यांनी या संदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. यामध्ये वनीकरण विभागाकडून कागदपत्रेच देण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, सदर प्रकरण दडपण्याची तयारी सामाजिक वनीकरण विभागाने चालवली असल्याने यामध्य्े मोठी अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चौकशी पथकाला कागदपत्रे देण्यात आली नसल्याने आता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतःच कामांची माहिती घेण्याची तयारी चालवली आहे. यामध्ये सदर वृक्षलगवडीची कामे कोणत्या योजनेतून झाली आहेत, कामे कंत्राटदारामार्फत करण्यात आली किंवा वनीकरण विभागामार्फत करण्यात आली, कामावर झालेला खर्च यासह इतर माहितीचा समावेश आहे. जिल्हाधिकारी गुप्ता प्रत्यक्ष कामांना भेटी देणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले. त्यामुळे या कामांतील अनियमितता बाहेर येणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वृक्ष लागवडीची कामे कोणत्या योजनेतून करण्यात आली आहेत याची माहिती घेतली जाईल त्यानंतर संबंधित विभागाकडून कागदपत्रे मागवून घेत त्याची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये अनियमितता आढळून आल्यास पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
