भोंदू अशोक खरात प्रकरणात केवळ छोटे मासे समोर:मोठ्या माशांना मोठ्या रकमा घेऊन अलगद बाहेर काढण्याचा प्रकार सुरू – रोहित पवार

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-10t15_1778406211.png




भोंदू अशोक खरात प्रकरणात सध्या केवळ छोटे मासे समोर आलेत. या प्रकरणात अनेक मोठे मासे आहेत. या प्रकरणाच्या तपासातून त्यांची नावे वगळण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे या प्रकरणातील मोठे मासे कोण? असा प्रश्न चर्चिला जात आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी त्या सकाळीच नाशिक येथे दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त दावा केला आहे. ते म्हणाले, भोंदू खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले असून त्या प्रकरणातील 1% सत्य देखील समोर आलेले नाही. समोर जे काही आले आहे ते केवळ छोटे मासे आहेत . यामध्ये अनेक मोठे मासे देखील असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून हे प्रकरण नोंद होणार आहे. या प्रकरणाच्या तपासातून सुटका करून घेण्यासाठी किंवा नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजत आहे. मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून अलगद बाहेर काढले जात आहे. ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे त्यांना भोंदू विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करायला सांगितले जाते आणि या प्रकरणातून बाहेर काढले जाते अशी ही पद्धती असल्याची माहिती आहे. या माहितीची शहानिशा करून गृहमंत्री महोदयांनी योग्य ती कारवाई करावी, ही विनंती, असे ते म्हालेत. भोंदू खरात एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या जाळ्याचा भाग उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित पवार यांनी यापूर्वीच अशोक खरात हा केवळ एक भोंदू नसून, एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांच्या जाळ्याचा भाग असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, अशोक खरात हा केवळ भोंदू नाही. तो एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांच्या जाळ्याचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया, दुबईसह 4-5 देशांमध्ये हवालाच्या माध्यमातून पैशांची उलाढाल करण्यात आली आहे. या व्यवहारांमध्ये केवळ वैयक्तिक फसवणूक नाही, तर भ्रष्ट अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचेही पैसे परदेशात पाठवले गेल्याची शक्यता आहे. हजारो कोटी रुपयांची रक्कम या मार्गाने बाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याकडे केवळ एका गुन्हेगारी घटनेप्रमाणे न पाहता व्यापक आर्थिक आणि राजकीय संदर्भात तपास करण्याची गरज आहे, असे ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. MMRDA मधील अनियमिततेवरही बोट दुसरीकडे, रोहित पवार यांनी एका पोस्टद्वारे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचारावरही ताशेरे ओढले. ते म्हणाले, MMRDA विरोधात Systra या फ्रेंच कंपनीने केलेल्या तक्रारीची आणि आरोपांची चौकशी करुन 15 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये दिले होते. हा आदेश देऊन एक वर्ष झालं तरी अद्याप हा चौकशी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. या अहवालात MMRDA च्या काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कठोर ताशेरे ओढण्यात आले असल्याचं बोललं जात असल्याने हा अहवालच दाबला जाण्याची शक्यता आहे. हा केवळ MMRDA चा विषय नाही तर राज्याच्या प्रतिमेचाही विषय आहे. या पार्श्वभूमीवर हा अहवाल सार्वजनिक करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि या अहवालाची प्रत देण्याची मागणी नगरविकास विभागाकडं केली. येत्या अधिवेशनात यावर विधिमंडळात आवाज उठवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed