औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट!:266 कोटींच्या विकास आराखड्याला सोमवारी मिळणार मंजुरी
![]()
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे विविध विकास कामांसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून २६६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी ता. ११ पालक सचिव रिचा बागला यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. या शिवाय रथोत्सव कार्यक्रम या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. या कार्यक्रमास सुमारे १ लाखापेक्षा अधिक भाविक हजर असतात. या सोबतच श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर देशभरातून भाविक या ठिकाणी येतात. भाविकांच्या सोईसाठी संस्थानच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जातात. मात्र राज्यातील इतर ज्योतिर्लिंग देवस्थानच्या तुलनेत या ठिकाणी आणखी सुविधा असणे अपेक्षीत आहे. दरम्यान, या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुढाकार घेतला असून मागील आठवड्यात त्यांनी औंढा नागनाथ येथे भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी संस्थानकडून विकास कामांची माहिती घेतली होती तसेच आता काय विकास कामे करणे अपेक्षीत आहे याची माहिती घेऊन त्याचा सविस्तर आराखडा तयार केला आहे. या ठिकाणी विकास कामांसाठी २६६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये ५० कोटी रुपये पुरातत्व विभागाला दिले जाणार आहे. त्यातून नागनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या मंदिराची कामे केली जाणार आहेत. तसेच इतर निधी बांधकाम विभागाकडे दिला जाणार असून त्यातून भक्तनिवास बांधकाम, उद्यान, दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी यासह इतर कामे केली जाणार आहेत. दोन टप्प्यातील या विकास आराखड्यांवर सोमवारी ता. ११ सकाळी हिंगोलीच्या पालक सचिव रिचा बागला यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.
