‘कॉर्पोरेट जिहाद’चे कनेक्शन; आश्रयदात्याला मोक्का लावा:छत्रपती संभाजीनगरमधील एका नेत्याने दिला होता आश्रय
![]()
नाशिक येथील टीसीएस बीपीओ युनिटमधील महिलांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराच्या प्रकरणाचे धागेदोरे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये खोलवर रुजल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा एजाज खान हिला ७ मे रोजी शहरातून अटक झाल्यानंतर, तिला ४० दिवस आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत शिवसेना आणि युवासेना आक्रमक झाली आहे. शनिवारी या संदर्भात पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली. सखोल तपासाची मागणी करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. निदा खान ही नारेगाव परिसरात एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या आश्रयाला होती, असा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. दुसरीकडे, युवासेनेने पोलिस उपायुक्त पंकज आतुलकर यांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय नि:पक्षपणे करण्याची मागणी केली. यावेळी गटनेते किशोर नागरे, नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल, शुभम काळे, यशोदा शेळके यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू क्रांती संघटनेकडून संताप: पोस्टर्सची साताऱ्यात केली होळी या घटनेचे पडसाद शहरात उमटत आहेत. सातारा परिसरातील छत्रपती संभाजी चौकात हिंदू क्रांती संघटनेने महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लव्ह जिहादचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी निदा खान आणि मतीन पटेल यांच्या फोटोंचे पोस्टर्स जाळले. संताप व्यक्त केला. वैयक्तिक धर्मांतराचे प्रकरण नव्हे, कॉर्पोरेट जिहाद हे केवळ वैयक्तिक धर्मांतराचे प्रकरण नाही. याला ‘कॉर्पोरेट जिहाद’चा पदर असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आयटी हब मानल्या जाणाऱ्या कंपन्यांमध्ये अशा प्रकारे रॅकेट चालवणे सुरक्षेच्या दृष्टीने मोठी त्रुटी आहे. शहरात फरार आरोपीला ४० दिवस कोणाचे अभय मिळाले, याची चौकशी झाल्यास अनेक बड्या नावांचे ‘कनेक्शन’ समोर येऊ शकते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीय दृष्ट्याही तापण्याची चिन्हे आहेत. पडद्यामागचे अर्थकारण,आश्रय निदा खान फरार असताना तिला आणि तिच्या कुटुंबाला नारेगावसारख्या दाट वस्तीच्या भागात लपवून ठेवण्यात आले होते. तपासात समोर आले आहे की, मतीन पटेल (मजिद पटेल) यांनी तिला रसद पुरवली. एमआयएम नेत्यांनी उघडपणे निदाचे समर्थन केल्याचे आरोप शिवसेनेने केले आहेत. यामागे मोठे आर्थिक जाळे किंवा राजकीय कट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कलम १२०(ब) अंतर्गत गुन्हेगारी कटाचा तपास सुरू आहे.
