निदा खान आणि आईची समोरासमोर दीड तास चौकशी:MIM नगरसेवक मतीन पटेलांच्या घरावर नोटीस; आश्रय दिल्याचा आरोप
![]()
नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला पोलिसांनी अखेर छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत. या तपासात एक खळबळजनक बाब समोर आली असून, निदा खानला लपण्यासाठी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. आता पोलिसांनी निदा खानसह तिची आई आणि नातेवाईकांची कसून चौकशी केल्याचे समोर आले आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांची आज सुमारे दीड तास कसून चौकशी करण्यात आली असून, पोलिसांनी निदा आणि तिच्या आईला समोरासमोर बसवून प्रश्नांचा भडिमार केला. निदा फरार असताना नेमकी कुठे लपली होती, पळून जाण्यामागचे नेमके कारण काय आणि या काळात ती कोणाकोणाच्या संपर्कात होती, या तांत्रिक बाबींवर तपासाचा मुख्य रोख होता. या चौकशीत निदाचे आई, वडील, भाऊ आणि मावशीचाही समावेश होता. सध्या त्यांना सोडून देण्यात आले असले तरी, तपासाच्या आवश्यकतेनुसार त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. मतीन पटेल यांच्या घराबाहेर नोटीस दरम्यान, निदा खानला ज्या घरात लपवून ठेवण्यात आले होते, ते घर नगरसेवक मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी हनीफ खान युसुफ खान यांच्याकडून खरेदी केल्याचा आरोप असून, विशेष म्हणजे याच ठिकाणी मतीनचे कार्यालय देखील आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने मतीनच्या घर आणि कार्यालयावर नोटिसा बजावत तेथील बांधकाम बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेने मतीन पटेल यांच्या घराबाहेर नोटीस चिकटवली असून, या बेकायदेशीर बांधकामाबाबत आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. निदा खान प्रकरणावर असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले? असदुद्दीन ओवेसी म्हणाले, टीसीएसचे स्टेटमेंट आपण पाहिले असेल. निदा खानचा एचआरशी कोणताही संबंध नव्हता. एफआयआर होण्यापूर्वी निदा खानची बदली झाली होती. काही लोक मीडिया ट्रायल करत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. बुरखा घालणं कधीपासून बेकायदेशीर झालं? आमचा न्यायालयावर विश्वास आहे. निदा खानवरील आरोप टिकणार नाहीत. केवळ द्वेषापोटी आरोप केले जात आहेत. आरोप झाले म्हणजे शिक्षा झाली असं नाही. एमआयएमला टार्गेट करा, काहीही फरक पडत नाही.
