पुण्यात डेटिंग ॲपद्वारे लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:वारजे माळवाडी पोलिसांनी ३० मिनिटांत आरोपींना केली अटक
![]()
पुणे शहरात ‘गे डेटिंग अँड चॅट’ या मोबाईल ॲपचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांची लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी अवघ्या अर्ध्या तासात दोन आरोपींना जेरबंद केले आहे. यात एका सज्ञान आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदार तरुणाला डेटिंग ॲपद्वारे चॅटिंग करून भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते. तो तरुण भेटायला गेल्यानंतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या मोबाईलवरून स्वतःच्या खात्यात जबरदस्तीने पैसे हस्तांतरित करून घेतले आणि त्याच्या गळ्यातील चांदीची साखळी हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर पीडित तरुणाने तात्काळ वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. तपास पथकाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांच्या टीमने फिर्यादीकडून माहिती घेत तांत्रिक विश्लेषण केले. याच दरम्यान, पोलिस अंमलदार बालाजी काटे आणि महादेव शिंदे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील एक संशयित अतुलनगर चौकात थांबलेला आहे. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांच्या पथकाने केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी डेटिंग ॲप्स किंवा सोशल मीडियावरील ओळखीच्या व्यक्तींना भेटायला जाताना सावधगिरी बाळगावी. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये आणि काही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
