शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीवेळी मोदी-शिंदे यांची 'केमिस्ट्री':देवेंद्र फडणवीस म्हणाले – भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंगाल महत्त्वाचे राज्य
![]()
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली. या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील ‘केमिस्ट्री’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, भारताच्या सुरक्षा आणि विकासाच्या दृष्टीने पश्चिम बंगाल हे अत्यंत महत्त्वाचे राज्य असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील विजयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला ‘भारताचा विजय’ संबोधले. ते म्हणाले, “आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. हा केवळ भाजपचा विजय नसून भारताच्या सुरक्षेच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. पश्चिम बंगाल हे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राज्य आहे. येथे भाजपचे सरकार बनणे हा सर्व कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुवेंदू अधिकारी यांचे सरकार बंगालला नवीन उंचीवर नेईल, असा विश्वास मला आहे.” पीएम मोदी आणि शिंदे यांच्यातील हास्यविनोद सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. पंतप्रधान मोदी मंचावर आले तेव्हा त्यांनी विविध राज्यांतील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यापाशी आल्यावर पंतप्रधान बराच वेळ थांबले. त्यांनी शिंदेंचा हात हातात घेऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या संवादादरम्यान दोघांमध्ये जोरदार हास्यविनोद झाल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी काहीतरी बोलताच एकनाथ शिंदे खळाळून हसले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी केलेली ही जवळीक राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. बंगालच्या राजकारणात नवे पर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने बंगालमध्ये आता भाजप पर्वाला सुरुवात झाली आहे. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. भारताच्या सीमावर्ती सुरक्षेच्या दृष्टीने बंगालमध्ये अनुकूल सरकार असणे किती गरजेचे आहे, हेच फडणवीस यांनी आपल्या प्रतिक्रियेतून अधोरेखित केले.
