शाहू महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीचा विकास; दिवस शांत, अंधारात व्यवहार रंगात!

0
WhatsApp-Image-2026-05-09-at-12.10.40.jpeg


अलीकडेच या ठिकाणी अचानक नवीन मालकांची नावे झळकणारे बोर्ड उभे राहिले. कुठलीही घोषणा नाही, ना सार्वजनिक माहिती पण बोर्ड मात्र ताठ उभे! त्यानंतर दोन मोठे कंटेनर ठेवण्यात आले. जणू एखाद्या चित्रपटाचा सेट तयार होत आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दिवसात शांतता आणि रात्री अचानक हालचाली हा योगायोग म्हणायचा की नियोजनबद्ध विकास, हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.

विशेष म्हणजे आयटीआयजवळील ग्लोबल हॉस्पिटलच्या बाजूला काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या भूखंड ताबा प्रकरणाची आठवण या घडामोडींनी पुन्हा ताजी केली आहे. त्या वेळीही सुरुवात साध्या हालचालींनी झाली आणि शेवटी पत्र्याचे शेड उभे राहिले. त्यामुळे आता या नव्या जागेवरही आज कंटेनर, उद्या शेड आणि परवा मालकी हक्क अशी विकासाची पारंपरिक शृंखला पूर्ण होईल, असा उपरोधिक अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.

रात्रीच सर्व हालचाली का घडतात, हा मात्र सर्वसामान्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे. जर सर्व काही कायदेशीर असेल, तर चंद्रप्रकाशातच कागदपत्रांना ऊर्जा मिळते का? दिवसाच्या उजेडात काम करण्यास नेमका कोणता अडथळा आहे, हे कोडे अजून उलगडलेले नाही.

या जागेवर काही राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थितीही नागरिकांनी पाहिल्याचा दावा केला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) संबंधित काही व्यक्ती येथे बसल्याचे सांगितले जाते. काहींकडे छायाचित्रे असल्याची चर्चा आहे. मात्र अधिकृतरीत्या कोणीही काही सांगण्यास तयार नाही कारण शहरात ‘मौन’ हेच सध्या सर्वात सुरक्षित विधान मानले जात आहे.

या वादात सुंदरसिंग तेहरा या नावाचाही उल्लेख होत आहे; परंतु आश्चर्य म्हणजे संबंधित नाव बोर्डवर दिसत नाही. मग जागा नेमकी कोणाची? कंपनी कोणती? कंटेनर कोणाचे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा विकास नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? प्रश्नांची यादी वाढत आहे, पण उत्तरांची फाईल मात्र अद्याप उघडलेली नाही.

स्थानिक नागरिकांच्या मते, हा प्रकार साधा अतिक्रमण नसून ‘भूखंड माफिया संस्कृती’चा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका बाजूला शेकडो लोकांचा गट सक्रिय असल्याचे दिसते, तर दुसऱ्या बाजूला फक्त तीन कुटुंबे असहाय्यपणे परिस्थितीकडे पाहताना दिसत आहेत. या विषम लढतीत न्याय कुठे उभा आहे, हा खरा प्रश्न आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलिसांची भूमिका. या भागात रात्री गस्त नसते का? इतक्या हालचाली सुरू असताना प्रशासनाला काहीच दिसत नाही का? की रात्रीच्या अंधाराने कायद्यालाही डोळे मिटायला भाग पाडले आहे?

सध्या तरी दिवसात सर्व काही शांत आणि नियमबद्ध दिसते. पण रात्री शहरात अदृश्य विकास सुरू असल्याची चर्चा जोर धरत आहे. आता प्रशासन जागे होणार की पुढील काही दिवसांत येथे आणखी एखादे शेड उभे राहून नवीन मालकी हक्क जाहीर होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.कारण नागरिकांचा एकच सवाल विकास होतोय की भूखंडांचा रात्रीचा खेळ सुरू आहे?जनतेला प्रश्न असाही आहे की हा विकास कोण्या नेत्याच्या आशीर्वादने सुरु आहे की प्रशासनाच्या आशीर्वादने देवालाच माहित कारण त्या देवा समोर सुद्धा मोदकांचा प्रसाद वाहिला जात असतोच.

भूखंड माफिया हा प्रकार आजचा सुरु झालेला नाही पण सध्या सुरु असलेला प्रकार जरा जास्तच झाला आहे अशी चर्चा लोक करीत आहे. काल पर्यंत या ठिकाणी कोणताच बोर्ड नव्हता तर अचानकच कसा काय आला ? आजच्या पूर्वी या ठिकाणी नावांचा बोर्ड लावायची गरज का वाटली नाही,काय वाद आहेत ते वाद कुटुंबाचे आहेत की बाहेरच्या व्यक्ती सोबत आहेत असे प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत.

संबंधित बातमी …..

भूखंडावर जबरदस्ती ताब्याचा प्रकरण; पोलिसांकडून सिव्हिल मॅटर म्हणत टाळाटाळ?



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed