कळवणमध्ये जनगणना प्रशिक्षण पूर्ण; कर्मचारी फिल्ड वर्कसाठी सज्ज:41 प्रशिक्षणार्थींचा सहभाग; अचूक माहिती संकलनावर समन्वयकांचा भर
![]()
भारत सरकारच्या आगामी जनगणना अभियानाच्या पार्श्वभूमीवर कळवण नगरपंचायतीअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक व प्रगणकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले. ५, ६ आणि ७ मे या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षणानंतर आता संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष जनगणना कार्यासाठी सज्ज झाले आहेत. या प्रशिक्षण सत्रात फिल्ड ट्रेनर यांनी जनगणनेची कार्यपद्धती, माहिती संकलन प्रक्रिया, ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर आणि नागरिकांशी संवाद साधण्याचे कौशल्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ६ मे रोजी जनगणना जिल्हा समन्वयक विशाल दिवेकर यांनी प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. माहिती संकलन करताना कोणती दक्षता घ्यावी आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून काम अचूक कसे पूर्ण करावे, याबाबत त्यांनी मौलिक सूचना दिल्या. या प्रशिक्षणात एकूण ४१ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. फिल्ड ट्रेनर म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (कळवण मुले) येथील शिक्षक देविदास मोरे, चंद्रकांत गोंडूराव खिरोळकर (जि.प. शाळा नरहरहुडी) आणि कळवण नगरपंचायतीचे स्थापत्य अभियंता अमोल बत्तीसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशासकीय अधिकारी निवृत्ती कुवर यांनी उपस्थितांचे आभार मानले. जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे कळवण शहरातील नागरिकांनी प्रगणकांना विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कळवण नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, प्रत्येक घरापर्यंत पोहोचून पारदर्शकपणे माहिती संकलित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
