अमरावतीत मुख्य जलवाहिनी फुटली, दोन दिवस पाणीपुरवठा बंद:कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्तीत अडचण, मजीप्रासमोर आव्हान

0
895434e3-ba04-4f5f-aadb-72e65ab52f29_1778170088286.jpg




अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मोर्शी तालुक्यातील डवरगाव एमआयडीसी गेटजवळ फुटली आहे. यामुळे गुरुवार सायंकाळपासून दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्ती कार्यात अडचणी येत असल्याने पुढील दोन दिवस, म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार, पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मोर्शी येथील सिंभोरा अप्पर वर्धा धरणातून येणारी ही १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फुटली. जलवाहिनी फुटल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, ज्यामुळे तलावासारखी स्थिती निर्माण झाली होती. एमआयडीसी क्षेत्रात असल्याने आजूबाजूच्या पडिक जमिनीत पाणी पसरले. या घटनेमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून, माहुली जहागीरजवळील काही शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचेही किरकोळ नुकसान झाले आहे. ही जलवाहिनी जुनी आणि जीर्ण झाल्यामुळे ती वारंवार फुटण्याच्या घटना घडत असतात. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात अनेकदा व्यत्यय येतो. अमरावती-बडनेरा शहराला पाणी पुरवणारी ही मुख्य जलवाहिनी तपोवन येथील जलशुद्धीकरण केंद्राशी जोडलेली आहे. तेथे पाणी शुद्धीकरण झाल्यानंतर ते शहरातील विविध जलकुंभांपर्यंत पोहोचवले जाते. जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने शुक्रवार आणि शनिवारचा पाणीपुरवठा बंद राहील, असे मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. दुरुस्ती कार्यासाठी कंत्राटदारांशी दुपारपासूनच बोलणी सुरू होती. जुनी देयके प्रलंबित असल्याने संपावर असलेल्या कंत्राटदारांनी सुरुवातीला असहकार दर्शवला. मात्र, नागरिकांच्या हितासाठी त्यांची मनधरणी करण्यात मजीप्राला यश आले. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासूनच दुरुस्ती कार्य हाती घेण्यात आले आहे. सुरुवातीला घटनास्थळावरील साचलेले पाणी (डी-वॉटरिंग) काढले जाईल. त्यानंतर गळती नेमकी कोठून झाली आणि पाईप किती प्रमाणात फुटला आहे, याची पाहणी करून प्रत्यक्ष दुरुस्ती कार्याला सुरुवात केली जाईल, अशी माहिती मजीप्राचे उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *