पुण्यात डीजेवरून वाद पेटला!:विद्यानंद बापटांवर 'नक्षली'चा आरोप, गुन्हा दाखल करण्याची शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींची मागणी

महाराष्ट्र

[ads1]


पुण्यात गणेशोत्सव काळात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या बैठकीनंतर विद्यानंद बापट हे नाव चर्चेत आले असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपण नास्तिक असल्याचे स्पष्ट करत, प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य असले तरी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याची भूमिका बापट यांनी मांडली आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेनंतर पुण्याच्या गणेशोत्सवावर त्यांनी बोलू नये, असा आक्षेप घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. नारायण पेठेतील बापट विरुद्ध सदाशिव पेठेचे महाजन आणि कोथरूडचे कुलकर्णी असा वाद आता रंगू लागला आहे. विद्यानंद बापट यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सोशल मीडियावर ‘तापट बापट’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची मागणी करणाऱ्या अनेक पुणेकरांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे, प्रशासनानेही या मुद्द्यावर कठोर पावले उचलली आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी गणेशोत्सवात डीजे आणि लेझरचा वापर केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, पुणेकरांनी आपला गणेशोत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करून दाखवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. बापटांवर नक्षली असल्याचा आरोप डीजेच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर आता वैयक्तिक आरोप होऊ लागले आहेत. पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी बापट हे अराजकवादी आणि नक्षली मानसिकतेचे असल्याचा गंभीर आरोप करत, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर, शशांक महाजन यांनीही बापट यांनी केवळ डीजेबाबत बोलावे, पुण्याच्या गणेशोत्सवाला लक्ष करू नये, असे सुनावले आहे. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी हे बापट यांच्याविरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मानवाधिकार आयोगाकडे धाव पुण्यातील ऐतिहासिक गणेशोत्सवातील कर्णकर्कश ध्वनी प्रदूषणाचा लढा आता केवळ रस्त्यापुरता किंवा सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलेला नाही. विद्यानंद बापट यांच्या या मोहिमेला आता डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांचीही भक्कम साथ मिळाली आहे. या वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर केळकर यांनी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) दरवाजे ठोठावले असून, अधिकृतपणे आपली तक्रार नोंदवली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस शरद केळकर यांनी मानवाधिकार आयोगाकडे केलेल्या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे आणि आरोग्याचे उल्लंघन होत असल्याच्या या मुद्द्यावर आयोगाने तत्परता दाखवली आहे. या प्रकरणाची सखोल दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, ज्यामुळे या प्रश्नाला आता प्रशासकीय आणि कायदेशीर पातळीवर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *