पंढरपुरमधील गोशाळेसाठी जागा देण्यास भाजप नगरसेवकांचा विरोध:गोशाळेतील दूध, तूप विठ्ठल रुक्मिणीच्या नैवेद्यासाठी वापरले जाते
![]()
ऐतिहासिक यमाई तलावाची सुमारे ३.१२ हेक्टर जागा गोशाळेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. मात्र, या निर्णयाला खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनीच कडाडून विरोध केला आहे. ही जागा मंदिर समितीला दिल्यास शहराचे एकमेव विरंगुळा केंद्र धोक्यात येईल, असा दावा करत ‘ यमाई तलाव बचाव समिती’ने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजपचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्तिकीयन एस. यांना निवेदन देण्यात आले. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत यमाई तलावाची ३.१२ हेक्टर जागा मंदिर समितीला देण्याचा निर्णय घेऊन १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, १८८२ पूर्वीचा हा ऐतिहासिक तलाव नगरपरिषदेच्या मालकीचा असून, त्यावर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. ही मोक्याची जागा गोशाळेला दिल्यास भविष्यात शेण-मूत्रामुळे जल आणि वायू प्रदूषण वाढेल, अशी भीती बचाव समितीने व्यक्त केली आहे. निवेदन देताना भाजपचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक सुजित कुमार सर्वगोड, ॲड. सुनील वाळूजकर, अमोल डोके, ॲड. गुरुदास अभ्यंकर, धर्मराज घोडके, सौरभ थिटे, इब्राहिम बोहरी, शरद माने, मालोजी शेंबडे, गणेश शिंदे-नाईक, प्रमोद कदम आदी उपस्थित होते. शहरातील एकमेव विरंगुळा केंद्राची जागा बळकावणे चुकीचे आहे. ही जागा मंदिर समितीला दिल्यास आम्ही तीव्र जनआंदोलन छेडू. नगरपरिषदेने तलावाच्या संवर्धनासाठी मोठा निधी खर्च केला आहे. . पर्यायी जागा उपलब्ध: मंदिर समितीच्या ताब्यात वाखरी, गोपाळपूर आणि देगाव येथे मोठी जमीन असून तिथे गोशाळा विस्तारणे शक्य आहे. . निधीचा अपव्यय: शासनाने आधीच १.७१ कोटींचा निधी तलाव सुशोभीकरण आणि ‘ऑक्सिजन पार्क’साठी मंजूर केला असून त्याच्या निविदाही निघाल्या आहेत. . विरंगुळा केंद्र: येथे वॉकिंग ट्रॅक आणि तुळशीवृंदावन असल्याने हजारो नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक याचा वापर करतात.
