लाखो मुंबईकरांसाठी आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना थेट पत्र:सेस-नॉन सेस इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या चार मागण्या
![]()
मुंबईतील सेस आणि नॉन सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. विशेषतः जुन्या आणि धोकादायक अवस्थेतील इमारतींच्या दुरुस्ती तसेच पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री विशेष निधीतून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक इमारतींची स्थिती गंभीर असल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात मुंबईतील उपकरप्राप्त म्हणजेच सेस इमारतींसह नॉन सेस इमारतींचाही प्रश्न गंभीर असल्याचे नमूद केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या इमारतींच्या पुनर्विकासासाठी कायद्यात बदल करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने हजारो इमारतींमधील रहिवासी अजूनही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. सुमारे 14 हजारांहून अधिक इमारती आणि लाखो भाडेकरू या प्रक्रियेमुळे अडकून पडल्याचा मुद्दाही त्यांनी पत्रातून मांडला आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आदित्य ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. सर्व भाडेकरूंची योग्य नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच घरमालकांकडून होणाऱ्या दडपशाही आणि निष्कासन कारवाईपासून भाडेकरूंना संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, ज्या इमारतींची स्थिती अत्यंत खराब झाली आहे, अशा सेस आणि नॉन सेस इमारतींच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी पावसाळ्यापूर्वी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा दरम्यान, या प्रश्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून लाखो मुंबईकरांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने सरकारने या विषयावर ठोस निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रत्येक पावसाळ्यात गंभीर बनत असताना, आता सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
