भरधाव कारने दुचाकीला चिरडले, एकाचा मृत्यू:करमाळा- कोर्टी रस्त्यावरील भीषण अपघात‎

0
app_177816469969fca3dbb859a_397456.jpg




प्रवासात साधी चूक किंवा दुसऱ्याचा निष्काळजीपणा किती जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय देणारी घटना करमाळा तालुक्यात घडली. कोर्टी- करमाळा रस्त्यावरील वीट हद्दीत एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात उमरड येथील शेतकरी दत्तात्रय भीमराव बंडगर (वय ४६) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने उमरड परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि. ६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दत्तात्रय बंडगर हे त्यांच्या बजाज प्लेटिना दुचाकीवरून (क्रमांक एमएच ४५ एसी १०२४) करमाळ्याच्या दिशेने निघाले होते. ते वीट गावाच्या हद्दीत कॅनॉलजवळ आले असता, पाठीमागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या टोयोटा ग्लान्झा कारने (क्रमांक एमएच २५ बीए १५९०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दत्तात्रय यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि उजव्या पायाला गंभीर इजा झाली. तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दत्तात्रय यांना तातडीने रुग्णवाहिकेतून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दत्तात्रय बंडगर हे उमरड येथे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने मारकड वस्ती आणि उमरड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ भाग्यवंत आजिनाथ बंडगर यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. कार चालक अजित बंकत धाबेकर (रा. छत्रपतीनगर, येडशी, ता. धाराशिव) याने आपली कार अतिशय वेगात आणि निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात घडला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed