केतकी माटेगावकरला बाबूलाल डाटा कलागौरव पुरस्कार प्रदान:भारतीय संगीताचा पाश्चात्त्य संगीताप्रमाणे जगभर प्रसार व्हावा – माटेगावकर

0
6f55384b-df07-4259-b874-80b18cd419b4_1778234201779.jpg




प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिला नुकताच बाबूलाल डाटा कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाश्चात्त्य संगीताप्रमाणे भारतीय संगीतप्रकारांचाही जगभर प्रसार व्हावा, अशी इच्छा तिने यावेळी व्यक्त केली. हा पुरस्कार ‘रंग माझा वेगळा’ या सांगीतिक कार्यक्रमात पं. रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते माटेगावकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी रंजना व प्रशांत डाटा, धिमान डाटा उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. लक्ष्मीनारायण चिवडाचे संस्थापक स्व. लक्ष्मीनारायण डाटा यांचे सुपुत्र स्व. बाबूलाल डाटा यांच्या नावाने डाटा कुटुंबीयांनी हा पुरस्कार सुरू केला आहे. संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो आणि यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. केतकी माटेगावकर म्हणाली, ‘सर्व संगीतप्रकारांचा आस्वाद घेता येणे, ही कलाकार म्हणून मोठी गोष्ट आहे. करिअर म्हणून गाणे करण्यासोबतच ते आनंदासाठी करावे असे मला वाटते. विशेषतः अधिकाधिक भारतीय संगीतप्रकार शिकावेत आणि गाता यावेत.’ त्यांनी नसरापूर घटनेतील चिमुरडीला श्रद्धांजली म्हणून आपले गाणे अर्पण केले. या पुरस्काराच्या निमित्ताने सुवर्णयोग जुळून आल्याची भावना तिने व्यक्त केली. ‘आयुष्यात गुरू असणे नशिबात असावे लागते आणि मी नशिबवान आहे,’ असे त्या म्हणाल्या. ‘अवघा रंग एक झाला’ या नाटकाच्या निमित्ताने पं. रघुनंदन पणशीकर यांच्यासारखे गुरू मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यामुळे नाट्यसंगीत म्हणजे काय हे समजले आणि केवळ गाणेच नव्हे तर विचारांमध्येही योग्य ते बदल घडले, असे केतकी माटेगावकरने नमूद केले. पं. पणशीकर यांनी गानसरस्वती किशोरीताईंच्या मार्गदर्शनाखाली लाभलेला वारसा सहजतेने पुढे नेला आहे. ताईंची गायकी समजून घेत त्यांनी स्वतःची शैली घडवली आहे, जो एक आदर्श आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्यालाही स्वतःची शैली घडवता यावी, अशी इच्छा माटेगावकर हिने व्यक्त केली. त्यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार मी आशीर्वाद म्हणून स्वीकारते, असेही ती म्हणाली. यावेळी पं. रघुनंदन पणशीकर यांनी केतकी माटेगावकर यांचे कौतुक केले. ‘केतकीला मी गायिका म्हणून ओळखत होतो, पण ‘अवघा रंग एक झाला’ या नाटकामुळे ती एक मल्टी-टॅलेंटेड कलाकार असल्याचे माझ्या लक्षात आले,’ असे ते म्हणाले. ‘तिने गायलेले दत्तगुरूंचे गाणे मी गायले आहे. तिने अशीच स्वररूपी ईश्वराची सेवा करत राहावी, तिला रसिकांचा नक्कीच प्रतिसाद मिळेल,’ असा विश्वास पणशीकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed