समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करा:मंत्री संजय शिरसाट यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

0
6aec5543-6530-459f-8236-f3e30f225365_1778235906436.jpg




सामाजिक न्याय विभागाने समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले. ‘सामाजिक न्याय’ संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने लोणावळा येथे आयोजित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सामाजिक न्याय खात्यातील सहसचिव सो.ना. बागुल, उपसचिव वर्षा देशमुख, अवर सचिव सतीश खैरमोडे, तसेच राज्यातील प्रादेशिक उपायुक्त आणि सहायक उपायुक्त उपस्थित होते. शिरसाट यांनी सांगितले की, विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठे बदल घडवण्याचे काम केले जाते. वसतिगृहांना अनन्यसाधारण महत्त्व असून, राज्यात नवीन वसतिगृहे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये प्रवेश देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याची सूचना त्यांनी केली. विभागात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यांनी आपल्या कामातून वेगळी छाप निर्माण करावी आणि राज्याला दिशादर्शक ठरतील असे नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहन शिरसाट यांनी केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या जवळ निवासस्थान उपलब्ध करण्यासोबतच सोसायटी स्थापन करण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ही कार्यशाळा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विचारांची देवाणघेवाण आणि त्यांच्या अडचणी मांडण्याचे व्यासपीठ आहे. या कार्यशाळेतील निर्णयांची आणि चर्चेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून सकारात्मक परिणाम दिसले पाहिजेत. राज्याच्या अर्थसंकल्पात विभागासाठी मंजूर झालेला निधी वेळेत खर्च होईल, या दृष्टीने काम करावे, असेही शिरसाट यांनी नमूद केले. प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. विभागामार्फत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर घटकांसाठी लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी काम करावे. येत्या काळात शिक्षण, पायाभूत सुविधा, उद्योजकता, सामाजिक सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या पाच पैलूंवर काम करून विभागाची धोरणे ठरविण्यात येतील. ‘विकसित महाराष्ट्र २०२७’ चा दृष्टिकोन समोर ठेवून प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन डॉ. कांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed