व्हिएतनामचा विन ग्रुप महाराष्ट्रामध्ये 6.5 अब्ज डाॅलर्स गुंतवणूक करणार:संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध- देवेंद्र फडणवीस
![]()
व्हिएतनामचा विन ग्रुप महाराष्ट्रात लवकरच ६.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम गुरुवारी मुंबई दौऱ्यावर होते. त्यानिमित्ताने आयोजित इंडिया – व्हिएतनाथ बिझनेस फोरम कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. व्हिएतनामच्या उद्योजकांना गुंतवणुकीसाठी राज्यात येण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून त्याला आधुनिक काळात मिळवून दिलेल्या अधिष्ठानाचा परिचय दिला. तसेच युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेली अजिंठा आणि वेरुळ येथील बौद्ध आणि जैन लेणी येथे व्हिएतनामच्या गुंतवणुकदारांचे स्वागत केले. छत्रपती संभाजीनगर आणि हो चि मिन्ह सिटी यांच्यात थेट हवाई सेवा सुरू करण्यासह स्वतंत्र बौद्ध पर्यटन सर्किट विकसित करण्याचा प्रस्ताव त्यांनी यावेळी मांडला. उद्योजकांनी पुढाकार घ्यावा : तो लाम भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सर्वंकष आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी उद्योग, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी या फोरममध्ये केले. मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक आणि औद्योगिक केंद्र असून येथे आयोजित हा कार्यक्रम भारत-व्हिएतनाम संबंधांना नवी दिशा देणारा असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नमूद केले. ईव्ही, पायाभूत सुविधांमध्ये संधी भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय व्यापार सातत्याने वाढत असल्याचे सांगून यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत होत असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नमूद केले. ते म्हणाले की, ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक वाहने, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान सेवा, ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांच्यात सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठा करार व्हिएतनामसोबतचा करार दक्षिण पूर्व आशियातून झालेला सर्वात मोठा करार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, गडचिरोली आदी शहरांमध्ये असलेल्या औद्योगिक संधींबद्दल माहिती देऊन फडणवीस यांनी व्हिएतनामच्या उद्योजकांना उद्योग, ऊर्जा, औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुंबई आणि पुणे येथील औषधनिर्माण क्षेत्र जागतिक दर्जाचे असून व्हिएतनामला परवडणारी जेनेरिक औषधे आणि लसींचा विश्वासार्ह पुरवठा करण्याची क्षमता राज्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र-व्हिएतनाम व्यावसायिक परिषद दरवर्षी मुंबई आणि हो चि मिन्ह सिटी येथे आळीपाळीने आयोजित करण्याचाही प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी मांडला. ‘एन्हान्स्ड कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रटेजिक पार्टनरशिप’ नव्या स्तरावर नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
