ट्रम्प यांनी मोदींना शुभेच्छा दिल्याचे वृत्त खोटे:संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – तामिळनाडूत 1 जागा आलेल्या भाजपला सत्ता स्थापन करू द्या
![]()
भारतामध्ये लोकशाहीच्या नावाने काय सुरू आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. भाजपने विधानसभा निवडणूक जिंकल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या हे वृत्त खोटे आहे नाहीतर ट्रम्प यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे शुभेच्छा दिल्या. उद्या ग्रामपंचायत निवडणूक जिंकले तर ट्रम्प मोदींना शुभेच्छा देतील का? हे भाजपच्या आयटी सेलला समजले पाहिजे. ट्रम्प यांना खरी माहिती देणं माझे कर्तव्य आहे. ट्रम्प यांच्याकडे बरेच कामे आहेत ते एका राज्याच्या निवडणुकीच्या विजयाबद्दल अभिनंदन करत फिरतील का? यामुळे मोदींची प्रतिमा खराब होईल याचा विचार भाजपच्या आयटीसेलने केला पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, तामिळनाडूमध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेला सत्तास्थापनेसाठी बोलावायला हवे होते. त्यांचे 108 आमदार निवडून आले आहेत. संविधानानुसार सर्वांत मोठ्या पक्षाला बोलावत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाते. महाराष्ट्रात सकाळी शपथविधी झाला त्यावेळी काय कोश्यारी यांनी बहुमत पाहिले होते का? उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यावेळी बहुमत पाहिले होते का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. लोकभवनामध्ये भाजपचे एजंट संजय राऊत म्हणाले की, लोकभवनामध्ये भाजपचे एजंट बसले आहेत. लोकभवन नाव असले तरी तिथे लोकांच्या भावनांची कदर नाही. 108 आमदार असलेल्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलवले पाहिजे असे आमचे संविधान म्हणते. तामिळनाडूमध्ये भाजपचा 1 सदस्य निवडून आला आहे त्याला सत्तास्थापनेसाठी बोलवा आणि 5 वर्षांचा वेळ बहुमत सिद्ध करण्यासाठी द्या, भाजप हे करू शकते. लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ताधाऱ्यांविरोधात लढतील आणि त्या लढाईत आम्ही सहभागी असणार आहोत. देशभरात लोकशाही वाचावी म्हणून आमची लढाई सुरू राहणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आहे. भाजप जिथे जिथे जाते सत्ता स्थापन करते त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह जगभरातील लोकं उपस्थित राहतील. कारण मोदींना ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्याची खोटी बातमी भाजपच्या आयटी सेलने पसरवली आहे.
