उपळाईमध्ये बोगस डॉक्टर गजाआड; चुकीच्या उपचारामुळे रुग्ण दगावला:प्रिन्स क्लिनिकवर पोलिसांची धाड; मृताच्या नातेवाइकांकडून कठोर शिक्षेची मागणी
![]()
वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारी कोणतीही पदवी नसताना आणि ॲलोपॅथी उपचारांचा अधिकार नसताना मागील २० वर्षांपासून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झाला आहे. बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथे ५ मे रोजी सकाळी १० वाजता ही कारवाई करण्यात आली. शंकर मनोहर पाठक ऊर्फ डॉ. एस. एम. पाठक (बी.ए.एम.एस. बोर्ड लावलेला) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्या क्लिनिकवर छापा टाकून पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी आपल्या पथकासह पाठक याच्या क्लिनिकवर छापा टाकला. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथीची इंजेक्शन, औषधे, सलाइन आणि प्रिन्स क्लिनिकचे लेटर पॅड मिळून आले. पथकाने सर्व साहित्य जप्त करून उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन रूम सील केल्या आहेत.कोणत्याही वैध पदवीशिवाय २० वर्षांपासूनपाठक हा रुग्णांची फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपरवाड व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संपूर्ण जिल्ह्यात बिनपरवाना आणि बोगस डॉक्टरांविरोधात व्यापक मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आता सर्व तालुकास्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी बार्शी तालुका पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. या घटनेला गंभीर वळण मिळाले असून, पाठक याने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे तानाजी नरहरी सुतार (वय ५८, रा. उपळाई ठोंगे) या इसमाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. अयोग्य उपचारामुळे सुतार यांची प्रकृती खालावली आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा अंत झाला, असा दावा संतप्त नातेवाईकांनी केला असून कठोर शिक्षेची मागणी केली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात पदवी नसताना खुशाल प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा बोगस डॉक्टरांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे चित्र समोर येत असून, आरोग्य प्रशासनाने आता कायमस्वरूपी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे.
