लॉकडाऊनमध्ये गमावला रोजगार:कुटुंबासाठी केली शेतमजूरी, आज 35 प्रकारच्या लोणच्यांचा ब्रँड; चित्रा बोरुडे यांची यशोगाथा

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-07t200546914_1778164613.jpg




महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या भागातील पारंपरिक चवी मुंबईकरांसमोर मांडल्या आहेत. हस्तकला, ग्रामीण उत्पादने आणि खाद्यसंस्कृती यांचा सुंदर संगम या मेळ्यात पाहायला मिळत आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मेंडकी गावच्या चित्रा विशाल बोरुडे यांनी सादर केलेल्या तब्बल ३५ प्रकारच्या लोणच्यांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रा बोरुडे यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले. त्यांचे पती कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते; मात्र लॉकडाऊनमध्ये त्याचं काम पूर्णपणे बंद पडलं. घरात दोन मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च आणि इतर जबाबदाऱ्या वाढू लागल्या. घर चालवण्यासाठी चित्रा आणि त्यांचे कुटुंब शेतात मजुरी करू लागले. मात्र दिवसभर काम करूनही केवळ १५० ते २०० रुपये मिळत असल्याने त्यातून घरखर्च भागवणे कठीण होत होते. या काळात चित्रा बोरुडे यांनी घरच्या घरी काहीतरी नवीन करण्याचा विचार केला. त्यांच्या घराच्या आजूबाजूला आंब्याची झाडं होती. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की, आपल्याकडे चांगल्या दर्जाचे आंबे आहेत, तर एकदा लोणचं करून पाहूया. आपल्याला लोणचं व्यवस्थित बनवता येतं का, त्याची चव लोकांना आवडते का, हे पाहण्यासाठी त्यांनी २०२० मध्ये सर्वप्रथम कैरीचं लोणचं तयार केलं. घरच्या घरी बनवलेलं हे लोणचं त्यांनी सुरुवातीला गावात विकायला नेलं. गावातील लोकांना त्याची चव आवडली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर त्यांनी तालुका पातळीवरही विक्री सुरू केली. हळूहळू ग्राहक वाढत गेले आणि त्यांच्या लोणच्यांची ओळख निर्माण होऊ लागली. व्यवसाय अधिक वाढवायचा असल्याने त्यांनी महिला बचत गटात सहभाग घेतला. त्यानंतर उमेद अभियानाच्या माध्यमातून त्यांनी लोणचं तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. या प्रशिक्षणातून विविध प्रकारची लोणची कशी तयार करायची, त्यामध्ये चव, गुणवत्ता आणि टिकाऊपणा कसा राखायचा, हे त्यांनी शिकून घेतलं. आज चित्रा बोरुडे या फक्त पारंपरिक आंबा, मिरची किंवा आवळ्याच्या लोणच्यांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्यांनी तब्बल ३५ प्रकारची लोणची तयार केली आहेत. यामध्ये कवठ्याचं लोणचं, लसणाचं लोणचं, करवंदाचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, अंबाडीचं लोणचं, चिंचेचं लोणचं, शेवग्याचं लोणचं, मिरची ठेचा लोणचं, हळदीचं लोणचं, कारल्याचं लोणचं, टोमॅटोचं लोणचं, फणसाचं लोणचं अशा अनेक प्रकारांचा समावेश आहे. त्यांच्या प्रत्येक लोणच्यात घरगुती पद्धतीची चव, स्थानिक कच्च्या मालाचा वापर आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांकडून सातत्याने पसंती मिळत आहे. सध्या चित्रा बोरुडे यांच्या सोबत ११ महिला मिळून हा व्यवसाय चालवत आहेत. सुरुवातीला गावापुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय आता हळूहळू चंद्रपूर जिल्ह्याबाहेरही पोहोचला आहे. राज्यातील विविध प्रदर्शनांमध्येही त्यांच्या लोणच्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. महालक्ष्मी सरस २०२६ मध्येही त्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विविध चवींची, वेगळ्या प्रकारची आणि घरगुती पद्धतीने बनवलेली लोणची पाहून अनेक ग्राहक आवर्जून खरेदी करत आहेत. चित्रा बोरुडे यांचा हा प्रवास साध्या घरगुती प्रयोगातून सुरू झाला आणि आज तो अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या व्यवसायात बदलला आहे. कठीण परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय यामुळे ग्रामीण भागातील महिलाही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतात, याचं हे उत्तम उदाहरण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed