11 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली!:अक्कलकोटमध्ये 'देऊळ बंद 2' चा टिझर लाँच; अभिनेत्री स्नेहल तरडे भावुक

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-07t173139758_1778155342.jpg




2015 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा दुसरा भाग तब्बल 11 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने स्वामीभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नुकताच या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टिझर अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मंदिरात भक्तांच्या अलोट गर्दीत आणि मोठ्या जल्लोषात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला प्रवीण तरडे यांच्यासह चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. यावेळी चित्रपटाविषयीची ओढ आणि स्वामींवरील श्रद्धेबद्दल बोलताना अभिनेत्री स्नेहल तरडे अत्यंत भावूक झाल्या आणि त्यांना आपल्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. स्नेहल तरडे काय म्हणाल्या? यावेळी बोलताना स्नेहल तरडे म्हणाल्या, हा चित्रपट आम्ही समर्पित करतोय अशा स्त्रियांना, ज्या आपल्या कुटुंबासाठी, परिवारासाठी आपल्या सर्वस्व पणाला लावतात. लढत असतात, कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टाची कोणी दखल घेवो, न घेवो त्यांना फरक पडत नाही. त्या कष्टाचा त्यांना मोबदला मिळो, न मिळो त्यांना फरक पडत नाही. आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी लढत राहतात. शेवटच्या श्वासापर्यंत मुला बाळांसाठी कष्ट सोसत असतात अशा स्त्रियांना ‘देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट समर्पित करत आहोत. स्वामींचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला ही संधी दिली. काम करण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते कैलाश वाणी यांचे खूप आभार. 2015 मध्ये स्वामी समर्थांच्या महिमेवर आधारित ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यातील शास्त्रज्ञाच्या आलिशान कारमधील स्वामींचा प्रवास गाजल्यानंतर, आता ‘देऊळ बंद 2’ मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या साध्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसणार आहेत. एका सामान्य कुटुंबाची ही असामान्य गोष्ट मांडणारा हा चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात या चित्रपटाचा टिझर सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed