सायबर चोरट्यांकडून चार जणांची 22 लाखांची फसवणूक:पुण्यात विविध पोलीस ठाण्यांत आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल
![]()
पुण्यात सायबर चोरट्यांनी चार वेगवेगळ्या घटनांमध्ये २२ लाख १५ हजार ६४३ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, सहकारनगर येथील २७ वर्षीय अजय अंकुश रसाळ यांची टास्क पूर्ण करण्याच्या आमिषाने ७ लाख २ हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी त्यांना टेलिग्रामवर लिंक पाठवून वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले होते. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाने तपास करत आहेत. ही घटना ९ ते २६ एप्रिल दरम्यान घडली. दुसऱ्या घटनेत, एरंडवणे येथील एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या क्रेडिट कार्डमधून व्यवहार करून ३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. २१ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अलंकार पोलीस करत आहेत. तिसऱ्या घटनेत, बाणेर-पाषाण लिंक रोड परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेची शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याच्या आमिषाने ३ लाख ८३ हजार ८० रुपयांची फसवणूक झाली. १९ ते २४ एप्रिल दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बाणेर पोलीस तपास करत आहेत. चौथ्या घटनेत, कोंढवा येथील २३ वर्षीय विजय रघुनाथ चव्हाण यांची ट्रेडिंगमधून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ८ लाख १२९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी गुजरात फॉरेस्ट नावाच्या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. ही घटना १८ डिसेंबर २०२५ ते १७ मार्च दरम्यान घडली असून, येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कारंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
