नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम; पाच दिवसांत ५२ गुन्हे दाखल

0
ChatGPT-Image-May-7-2026-11_56_35-AM.jpg


नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात १ ते ३१ मे २०२६ दरम्यान अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेच्या पाचव्या दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. विविध अवैध धंद्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण ५२ गुन्हे दाखल केले असून २५ लाख ७८ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात २ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून ९ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मटका-जुगार खेळविणाऱ्या व खेळणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ लाख ६६ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याशिवाय अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात २५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १ लाख २४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत ४ आणि कोटपा कायद्यान्वये ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या सर्व कारवायांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग घेतला. अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देण्यासाठी “खबर” हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती देता येणार आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस उपमहानिरीक्षक श्रेणी यांनी स्पष्ट केले आहे.


Post Views: 129






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *