LPG Gas Cylinder Price | व्यावसायिक गॅस सिलेंडर पुन्हा महागला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे नवीन दर
LPG Gas Cylinder Price | पश्चिम आशियातील इराण-अमेरिका संघर्षाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खर्चावर दिसू लागला आहे. 7 मे रोजी जाहीर झालेल्या नवीन दरांनुसार घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले असले तरी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅफे व्यवसायिकांवरील आर्थिक ताण आणखी वाढला आहे.
२८ एप्रिलपासून सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ही तिसरी मोठी वाढ मानली जात आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत तब्बल 993 रुपयांनी वाढून 3,071.50 रुपयांवर पोहोचली आहे.
दरम्यान, 5 किलोच्या एफटीएल (बाजारभाव) सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी 549 रुपयांना मिळणारा हा सिलेंडर आता 810.50 रुपयांना विकला जात आहे. विशेष म्हणजे, हा दर आता 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किंमतीच्या जवळपास पोहोचला आहे. घरगुती वापरासाठीचा 14.2 किलो एलपीजी सिलेंडर मात्र स्थिर आहे. 7 मार्च रोजी शेवटची 60 रुपयांची वाढ झाल्यानंतर दिल्लीत या सिलेंडरचा दर 913 रुपयांवर कायम आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, युद्धामुळे आयातीवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी 100 टक्के गॅस पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच व्यावसायिक गॅस पुरवठा सुमारे 70 टक्के सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून अतिरिक्त बुकिंग करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांनी मागील दोन दिवसांत जवळपास 15,900 टन व्यावसायिक एलपीजी, 876 टन ऑटो एलपीजी आणि 1.20 लाखांहून अधिक 5 किलोचे सिलेंडर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
आजचे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे प्रमुख शहरांतील दर:
नवी दिल्ली – ₹913 | ₹3,071.50
मुंबई – ₹912.50 | ₹3,024
कोलकाता – ₹939 | ₹3,202
चेन्नई – ₹928.50 | ₹3,237
हैदराबाद – ₹965 | ₹3,315
पटना – ₹1,002.50 | ₹3,346.50
लखनौ – ₹950.50 | ₹3,194
जयपूर – ₹916.50 | ₹3,099
बेंगळुरू – ₹915.50 | ₹3,152
चंदीगड – ₹922.50 | ₹3,092.50
News Title: LPG Gas Cylinder Price Hike Commercial Domestic Rates 7 May
