मासे कापू नका म्हणणाऱ्यांना ठाकरे गटाचा सवाल:मग जिवंत कोंबडी घरी न्यायची का? मासळी बाजारातील नव्या नियमांवरून राजकारण तापलं
![]()
मुंबईतील मासळी बाजारांमध्ये मासे कापून विकण्यावर घालण्यात आलेल्या कथित निर्बंधांमुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे कोळी समाजात संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरणही तापू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईच्या मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मासळी बाजारात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पद्धतीत अचानक बदल करण्याचा प्रयत्न हा अन्यायकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संपूर्ण वादाची सुरुवात मुंबईतील काही मासळी बाजारांमध्ये महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर झाली. मासे विक्रेत्यांना, विशेषतः कोळी महिलांना, बाजारात मासे कापण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रशासनाकडून मासे अख्खे विकावेत, अन्यथा दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बाजारात मासे कापल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाण, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. स्वच्छता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी कोळी समाजाने मात्र या निर्णयाला तीव्र विरोध सुरू केला आहे. या मुद्द्यावर अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरून थेट सरकारला आव्हान दिले. कोळी बांधव मुंबईत मासे विकणारच आणि ज्या पद्धतीने अनेक वर्षांपासून विकले जात आहेत, त्याच पद्धतीने विकतील, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. कोळी समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर गदा आणण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फक्त मासळी बाजारासाठीच स्वच्छतेचे नियम लागू होतात का, असा प्रश्न विचारत त्यांनी सरकारवर दुहेरी निकष लावल्याचा आरोप केला. अखिल चित्रे यांनी आपल्या वक्तव्यात आणखी आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट सवाल केला. जर मासे कापल्याने अस्वच्छता पसरते म्हणून बंदी घालायची असेल, तर मग चिकन घेताना लोकांनी जिवंत कोंबडी घरी न्यायची का? मटणासाठी जिवंत बकरा घेऊन जायचा का? असा टोला त्यांनी लगावला. नियम फक्त मासळी बाजारासाठीच का लावले जात आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोळी बांधवांना लक्ष्य करण्यामागे वेगळे राजकारण असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. चित्रे यांनी पुढे आरोप केला की, कोळीवाड्यांच्या जमिनींवर काहींचा डोळा असून त्यासाठीच अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. मुंबईच्या खऱ्या मानकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. महापालिकेने कारवाई करून दाखवावी, आम्हीही पाहू कोण कोळी बांधवांना डिवचतं, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे हा वाद केवळ मासळी बाजारापुरता मर्यादित न राहता आता तो राजकीय संघर्षात रूपांतरित होण्याची चिन्हे दिसत आहेत. कोळी समाज आणि प्रशासन आमनेसामने येण्याची शक्यता दरम्यान, या निर्णयामुळे मुंबईतील मासळी बाजारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोळी समाज आणि प्रशासन आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या मुद्द्यावर आंदोलन तीव्र होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईच्या पारंपरिक मासळी व्यवसायावर होणारे परिणाम, कोळी समाजाची उपजीविका आणि प्रशासनाची स्वच्छतेची भूमिका या सर्व मुद्द्यांमुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. आता सरकार या प्रकरणावर काय भूमिका घेते आणि प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.
