कामगार कल्याणासाठी सरकारचा मोठा निर्णय!:40 वर्षांवरील वयोगटातील कामगारांची आता दरवर्षी होणार आरोग्य तपासणी

0
c5e5379a-0335-4b1b-b89c-dca0b4fc38bb_1778154010133.jpg




नवीन कामगार संहितेनुसार 40 वर्षांवरील कामगारांसाठीच्या वार्षिक आरोग्य तपासणी शिबिराचा राज्यात शुभारंभ करण्यात आला. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पुण्यातील बिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयात या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) रुग्णालये उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्त रमेश चव्हाण, इतर वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. हा उपक्रम नवीन कामगार कायद्यांतर्गत प्रस्तावित असून, 40 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील कामगारांसाठी देशव्यापी वार्षिक आरोग्य तपासणीचा भाग आहे. या देशव्यापी उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी नवी दिल्ली येथील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, बसैदारापूर येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते झाला. त्याच वेळी देशातील इतर 11 ईएसआयसी रुग्णालयांमध्येही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यात पुण्यातील ईएसआयसी रुग्णालयाचा समावेश होता. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले की, कामगारांना कोणताही आजार होण्यापूर्वीच त्यांची आरोग्य तपासणी करणे हा सरकारचा उद्देश आहे. नियमित तपासणीमुळे गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन कामगारांना मोठ्या आरोग्य धोक्यांपासून वाचवता येईल. राज्यात औद्योगिकीकरण वाढत असल्याने कामगारांची संख्याही वाढत आहे, त्यामुळे ईएसआयसी रुग्णालयांची गरज भासत असून, केंद्र सरकारसोबत सल्लामसलत करून रुग्णालयांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी औद्योगिक अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या कामगारांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांची मदत घेण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची गरज व्यक्त केली. अनेक खासगी रुग्णालये आणि डॉक्टर ही सेवा मोफत देण्यास तयार असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed