वृक्षतोडीमुळे उन्हाच्या झळा:सोलापुरात झाडी असलेल्या व्हीआयपी रोडवर दुपारी 1.30 वाजता पारा 40 अंश, 500 मीटरवरील रेल्वे स्टेशन मार्गावर मात्र 43 वर

0
new-project-2026-05-07t100841719_1778129038.jpg




‘झाडे लावा, झाडे वाचवा’ हा संदेश सातत्याने दिला जातो. मात्र तो गांभीर्याने घेतला जात नाही. आपल्या भागात, शहरात झाडे का आवश्यक आहेत? याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने एक प्रयोग केला. कडक उन्हात दुपारी 1.30 ते 2 या वेळेत आम्ही थर्मामीटरच्या सहाय्याने शहरातील दोन प्रमुख रस्त्यांवरील तापमान मोजले गेले. संगमेश्वर कॉलेजपासून ते जुना एम्प्लॉयमेंट चौकापर्यंत (व्हीआयपी रोड) रस्त्याच्या दुतर्फा मोठी आणि गर्द झाडी आहेत. त्यामुळे भर उन्हात अनेक पादचारी या सावलीच्या आडोशाला थांबलेले असतात. याच व्हीआयपी रोडवरील झाडांच्या खाली थांबून ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने दुपारी 1.30 ते 2 या वेळेत थर्मामीटरने तेथील तापमान मोजले असता, तेथे 40 अंश नोंद झाली. इथून अवघ्या 500 मीटरवर असलेल्या सात रस्ता ते रेल्वे स्थानक या मार्गावरील रेल्वेच्या विभागीय कार्यालयाजवळ भर उन्हात थांबून तापमान मोजले. इथे नावालाच एखाद दुसरे झाड आहे, तिथे मात्र थर्मामीटरवर थेट 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. झाडे नसलेल्या ठिकाणी त्याच वेळेत 3 अंश उन्हाचा कडाका जास्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे तुलनेने व्हीआयपी रोडवर पादचाऱ्यांची वर्दळ जास्त तर रेल्वे स्थानक रस्त्यावर या दुपारच्या वेळी कमी वर्दळ दिसून आली. उष्णता शोषून घेणारी नैसर्गिक यंत्रणाच नष्ट विकासाच्या नावाखाली सोलापूर शहरात बेसुमार वृक्षतोड झाली आहे. वाढते डांबरीकरण, इमारतींचे काँक्रिटीकरण आणि वाहनांच्या धुरामुळे शहरात अर्बन हीट आयलंड तयार होत आहे. झाडे कमी झाल्याने वातावरणातील उष्णता शोषून घेणारी नैसर्गिक यंत्रणाच नष्ट होत चालली आहे, ज्यामुळे सोलापूरचे तापमान दरवर्षी नवे उच्चांक गाठत आहे. दिव्य मराठी एक्स्पर्ट डॉ. सुनील गोविंदे, फिजिशियन 43 तापमानात गंभीर इजा होण्याचा धोका 40 अंश तापमानात शरीरातून प्रचंड घाम येतो, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि तीव्र थकवा जाणवतो. मात्र, तापमान 43 अंशांवर पोहोचल्यास शरीराची नैसर्गिक शीतकरण यंत्रणाच कोलमडते. अशा तीव्र उष्णतेत घाम येणे थांबून थेट उष्माघात होण्याचा मोठा धोका असतो. यामुळे चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे आणि प्रसंगी अंतर्गत अवयवांना गंभीर इजा पोहोचू शकते. त्यामुळे उन्हात घराबाहेर पडणे टाळावे. सिमेंट आणि डांबरामुळे तापमान जास्त सात रस्ता ते रेल्वे स्टेशन हा मार्ग मोठ्या प्रमाणावर डांबरीकरणाचा असून तिथे झाडांचा अभाव आहे. मोकळ्या रस्त्यावर सूर्याची थेट किरणे पडतात. सिमेंट आणि डांबर उष्णता लवकर शोषून घेते आणि ती वातावरणात परावर्तित करते. त्यामुळे तिथे 43 अंश तापमान नोंदवले गेले. याउलट, जुना एम्प्लॉयमेंट रस्ता गर्द झाडीने वेढलेला आहे. झाडांच्या पानांमुळे सूर्याची किरणे थेट जमिनीवर पोहोचत नाहीत आणि झाडांमुळे नैसर्गिक गारवा निर्माण होतो, त्यामुळे तेथे तापमान 40 अंशांपर्यंतच मर्यादित राहिले. देशी वृक्षांची लागवड करणे हाच एकमेव शाश्वत उपाय ग्लोबल फॉरेस्ट वॉच आणि उपलब्ध माहिती अधिकारच्या आकडेवारीनुसार 2001 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्राने सुमारे 22,400 हेक्टर वृक्षच्छादित क्षेत्र गमावले आहे. त्यामुळे दरवर्षी आपल्याकडील तापमान वाढ होत आहे. सोलापूरही त्याला अपवाद नाही. झाडे केवळ सावली देण्याचे काम करत नाहीत, तर ती नैसर्गिक एअर कंडिशनर सारखे काम करतात. पानांमधून होणाऱ्या बाष्पोत्सर्जनामुळे आसपासची हवा थंड राहते. काँक्रीट आणि डांबराचे रस्ते उष्णता साठवून ठेवतात. सोलापूरसारख्या उष्ण शहरात तापमान नियंत्रणात ठेवायचे असेल, तर रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागांवर देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे हाच एकमेव वैज्ञानिक आणि शाश्वत उपाय आहे. – डॉ. रामचंद्र साबळे, हवामान शास्त्रज्ञ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed