तापलेल्या ओट्यावर जाताच बालकाचे भाजले पाय:जामनेरात तापमानाचा पारा 42 अंश पार; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन
![]()
वाकी रोड परिसरात कडक उन्हामुळे एका दोन वर्षीय बालकाचे पाय अक्षरशः भरताच्या वांग्यासारखे भाजले गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. नक्ष अजय पोमनानी असे या चिमुकल्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात उन्हाच्या तीव्रतेबाबत मोठी खळबळ उडाली आहे. नक्ष हा बालक शनिवारी दुपारी खेळता-खेळता विना चप्पल घराबाहेर ओट्यावर गेला. दुपारच्या प्रखर उन्हामुळे तापलेल्या ओट्यावर पाय ठेवताच त्याला तीव्र चटके लागले आणि तो जोरजोरात रडू लागला. मुलाचा आवाज ऐकून घरातील मंडळींनी तातडीने बाहेर धाव घेत त्याला घरात आणले. पायाची आग कमी करण्यासाठी त्यावर पाणी टाकताच, तळपायाला मोठे फोड आले. बालकाचे पाय भाजल्याचे लक्षात येताच पालकांनी त्याला तातडीने दवाखान्यात हलवले, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जामनेर शहराचे तापमान गेल्या काही दिवसांपासून ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. वाकी रोडवरील रेल्वे स्टेशन आणि न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने इतर भागांच्या तुलनेत येथे तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने कमी असते. मात्र, तुलनेने थंड समजल्या जाणाऱ्या या भागातही उन्हाचा असा चटका बसत असल्याने, इतर भागांतील उन्हाच्या भीषणतेचा अंदाज येत आहे. दरम्यान उन्हाचा पारा ४५ अंशांच्या पार गेल्याने लहान मुलांची काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. दुपारच्या वेळी, विशेषतः ११ ते ५ या काळात मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. तापलेल्या फरशीमुळे किंवा ओट्यामुळे मुलांच्या कोमल त्वचेला गंभीर जखमा होऊ शकतात, त्यामुळे घरातही मुलांना नेहमी चप्पल किंवा पायमोजे घालण्याची सवय लावा. मुलांच्या आहारात पाणी, ताक आणि लिंबू सरबताचा समावेश करा. जर चुकून मुलाचा पाय भाजला, तर त्यावर तातडीने थंड पाणी टाकून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ^गेल्या काही दिवसात तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विशेषतः लहान बालके, गरोदर माता यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. इतर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असेल तरच कानाला रुमाल बांधून बाहेर पडावे. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी पीत रहावे. -डॉ.अमोल सेठ, बालरोग तज्ञ, जामनेर.
