सोनगाव-सात्रळ,धानोरेत चोरट्यांची दहशत:काठ्या घेत नागरिकांची गस्त, महिलांमध्ये भीतीचे सावट; स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी
![]()
गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवरा परिसरातील सोनगाव-सात्रळ-धानोरे या पंचक्रोशीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सततच्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या अपुऱ्या गस्तीमुळे नागरिक आता स्वतःच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले असून, रात्री गस्त घालत आहेत. सोनगाव, सात्रळ आणि धानोरे ही गावे संगमनेर, राहाता व राहुरी अशा तीन तालुक्यांच्या सीमेवर आहेत. भौगोलिकदृष्ट्या हे क्षेत्र संवेदनशील असून प्रवरा पट्ट्यातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. याच भौगोलिक स्थितीचा फायदा चोरटे घेत असल्याचे दिसत आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. रात्रीच्या वेळी होणाऱ्या घरफोड्या आणि संशयास्पद हालचालींमुळे विशेषतः महिला वर्गात भीती पसरली आहे. पोलिसांची गस्त नावापुरतीच असल्याने तरुणांनी आता स्वतःची पथके तयार केली आहेत. हातात काठ्या आणि टॉर्च घेऊन युवक रात्रभर जागून गावाची राखण करत आहेत. “पोलिसांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही का?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा आलेख पाहता, या भागात तातडीने स्वतंत्र पोलिस स्टेशनची निर्मिती करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचक्रोशीतील नागरिकांनी दिला आहे. पोलिसांनी पाच स्वतंत्र पथके तयार करून रात्रभर गस्त घालावी प्रवरा परिसरातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या सोनगाव, सात्रळ, धानोरे पंचक्रोशीत वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने पाच स्वतंत्र पथके तयार करून रात्रभर गस्त घालावी. तसेच या पंचक्रोशीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरणार आहोत, असे प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे संचालक अॅड. आप्पासाहेब दिघे (धानोरे) यांनी सांगितले. ग्रामरक्षक दलाकडून चोरटे आल्याचा इशारा मिळताच गावकऱ्यांचे मोबाईल वाजू लागतात आणि चोरट्यांची पळापळ सुरू होते.सात्रळमध्ये १५ वेळा, सोनगावात १२ वेळा तर धानोरेमध्ये १५ वेळा अशा अलर्ट संदेशांनी नागरिकांना सतर्क केले आहे. चोरटे दारावर दगड मारणे, दार वाजवणे असे प्रकार करताच नागरिक ग्रामरक्षक दलाला माहिती देतात. त्यानंतर काही क्षणांतच शेजाऱ्यांचे मोबाईल वाजू लागतात आणि संपूर्ण परिसर ‘अलर्ट मोड’मध्ये जातो. एवढ्या जलद प्रतिसादामुळे चोरटे गोंधळून पळ काढत असल्याचे दिसून येत आहे.
