105 रुपयांचा विक्रमी दर! श्रीगोंद्याच्या मातीत पिकली "कोटींची द्राक्षं':पारगाव सुद्रिक येथील युवा शेतकरी मोहन जगताप यांची यशोगाथा
![]()
जिद्द, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर मातीतून सोनं उगवता येतं, हे श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील प्रगतशील शेतकरी मोहन ईश्वर जगताप यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाचे संकट, अवकाळी पावसाचा तडाखा आणि कोसळलेले बाजारभाव अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जगताप यांनी द्राक्ष शेतीतून कोटींची उलाढाल केली. सध्या संपूर्ण परिसरात त्यांच्या यशाची चर्चा रंगली आहे. मोहन जगताप यांनी आपल्या १० ते १२ एकर क्षेत्रात मोठ्या कष्टाने द्राक्ष बाग जोपासली आहे. गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांना अनेकदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र, हार न मानता त्यांनी नव्या दमाने शेतीचे नियोजन केले. योग्य खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केल्याने त्यांच्या बागेतील द्राक्षांचा दर्जा उंचावला. यंदाच्या हंगामात बाजारात द्राक्षांना मागणी वाढल्याने जगताप यांच्या बागेला प्रति प्लॉट ८० ते १०५ रुपयांपर्यंतचा विक्रमी दर मिळाला. या दरामुळे त्यांच्या द्राक्ष शेतीने यंदा कोटींची कमाई करून दिली आहे. संकटकाळात डगमगून न जाता सातत्य ठेवल्याने आज त्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने सोने झाले आहे. हे यश केवळ माझे नसून, संकटकाळात मला मार्गदर्शन करणारे माझे मित्र आणि कृषी औषध विक्रेत्यांचेही यात मोठे योगदान आहे, अशी भावना मोहन जगताप यांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशामुळे परिसरातील तरुण शेतकऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, पारगाव सुद्रिकचे नाव द्राक्ष शेतीसाठी राज्याच्या नकाशावर ठळकपणे उमटले आहे. द्राक्ष बागेवर दृष्टीक्षेप .क्षेत्र: १० ते १२ एकर द्राक्ष बाग .मिळालेला दर: ८० ते १०५ रुपये (प्रति प्लॉट सरासरी) .यशस्वी मंत्र: आधुनिक तंत्रज्ञान आणि चिकाटी .उत्पन्न: कोटींच्या घरात उलाढाल
