दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:गावातले लोक आपल्या मुलांना घराबाहेर खेळण्यासाठीही पाठवत नाहीत, चिमुकलीवर अत्याचाराची सहा दिवसांनंतरही नसरापूर गावात दहशत कायम
![]()
पुणे-सातारा महामार्गावरील 3500 लोकसंख्येचं नसरापूर गाव… गावात सिमेंटचे गुळगुळीत लांबलचक रस्ते. पण रस्त्यांवर चिटपाखरूही नाही. एकही मूल खेळताना दिसत नाही. सुरुवातीला असं वाटलं वैशाखातील रखरखत्या उन्हामुळं आई-बाप मुलांना घराबाहेर पाठवत नसावेत. पण हळूहळू गावकरी बोलू लागतात. त्यांच्या बोलण्यातून कळतं की, आई-बापच मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठवत नाहीयेत. कारण सहा दिवस उलटून गेले तरी या गावात त्या नराधमाची दहशत आहे. तो नराधम पोलिसांच्या कैदेत आणि गावातली चिमुकली मुलं भीतीच्या कैदेत आहेत. एरवी राजगड आणि तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी या गावात असते. मात्र, गेल्या आठवड्यापासून गावातल्या वातावरणात एक अनामिक भीती, संताप पसरला आहे. 65 वर्षीय नराधमाने 3 वर्षांच्या चिमुरडीवर 1 मे रोजी केलेला अत्याचार आणि खुनाच्या घटनेने नसरापूर हादरले आहे.
आपल्या 4 वर्षांच्या मुलीला शाळेत कसं पाठवायचं, असा सुन्न करणारा प्रश्न महिला विचारत आहेत. नसरापूरमध्ये सर्वात प्रथम दिव्य मराठी प्रतिनिधी पोहोचला तेव्हा गावात शुकशुकाट आणि लोकांच्या, महिलांच्या मनात प्रचंड कोलाहल, गलबला होता. गावकऱ्यांनी भावनांना वाट करून देत सांगितलं की, मुख्य बाजारपेठेतील मानाच्या श्रीराम तरुण मंडळ गणेश मंदिराच्या कळसाचे काम सुरू आहे. तेथे हा नराधम भीमराव कांबळे विटा वाहण्याचे काम करत होता. आजी आणि आईसोबत राहणाऱ्या चिमुरडीला तो “गाईचे गोंडस वासरू दाखवतो,’ असे सांगून जवळच असलेल्या संदीप घायवळ यांच्या गोठ्यात घेऊन गेला. दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी तो तिला घेऊन गोठ्यात शिरला आणि 3 वाजून 54 मिनिटांनी बाहेर पडला. गोठ्यात जाताच त्याने चिमुरडीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. अत्याचारानंतर तिचा गळा दाबून खून केला. आणि तिचा मृतदेह गोठ्यातील अडगळीत पोत्याखाली लपवून तो थंडपणे गावातील काळुबाई मंदिराच्या ओसरीवर जाऊन झोपला. नशिबाने साथ दिली अन् सीसीटीव्हीने नराधमाला पकडले घटनेच्या दिवशी दुपारी 2.15 ते 4.45 पर्यंत वीज पुरवठा खंडित असल्याने गावातील सार्वजनिक 54 सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. मात्र, घटनास्थळापासून जवळच फरसाण बनवणाऱ्या योगेश जंगम यांच्या खाजगी सीसीटीव्ही जनरेटरवर वीज पुरवठ्यामुळे सुरू होता. त्यात ही चिमुकली त्या 65 वर्षांच्या ‘सैतानासोबत’ जाताना दिसली. ग्रामस्थांनी संशयावरून त्याला पकडले. पोलिसांच्या सखोल चौकशीत गोठ्यातून त्या चिमुरडीचा पांढऱ्या फ्रॉक मधील रक्ताळलेला मृतदेह बाहेर आला. आता त्या गोठ्याभोवती पोलिसांचा बंदोबस्त आहे. तेथे जाण्यापासून पोलिस रोखतात. त्या दिवशी कोणी सतर्कता दाखवली असती तर ती घटनाच घडली नसती. गावाची संतप्त मागणी नराधमाचा चौरंग करा! बदलापूरसारखा न्याय करा : ग्रामपंचायतीतील लिपिक तनुजा दळवी पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या, “मला माझ्या 4 वर्षांच्या मुलीला शाळेत पाठवायचीही भीती वाटतेय.’ गृहिणी पूनम शेटेंसह गावकऱ्यांनी संतप्त मागणी केली की, “अशा नराधमाचा चौरंग केला पाहिजे. बदलापूरमधील आरोपीसारखाच याचाही तात्काळ न्याय झाला पाहिजे.’ माजी सरपंच अनिल घायवळ आणि सराफा दुकानदार प्रसाद वाबगावकरांनी सांगितले की, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती असती तर त्याला गावात पाऊलच ठेवू दिले नसते. पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर, पण बंद! गावकऱ्यांच्या संतापाचे आणखी एक कारण म्हणजे सुरक्षा यंत्रणाच नाही. अत्याचाराची घटना घडली, तिथून 100 मीटरवर जुन्या पोलिस स्टेशनची इमारत आहे. मात्र, ती जीर्ण झाल्याचे सांगून दोन वर्षांपूर्वी पोलिस ठाणे दीड किमीवर हलवण्यात आले. गावात आता एकही पोलिस चौकी नाही. “इथं अवैध धंदे आणि चोऱ्या वाढल्या आहेत. जुनी चौकी सुरू असती तर गुन्हेगारांवर वचक राहिला असता,’ अशी भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली. सबळ पुरावे गोळा केले- संदीपसिंग गिल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितले की, आरोपीला कठोर शिक्षेसाठी आवश्यक सबळ पुरावे गोळा केले आहेत. तपासाधिकारी पोलीस निरीक्षक विजय पवारांच्या नेतृत्वातील पथक आवश्यक त्या साक्षी नोंदवत आहे. यापूर्वी दोघींवर अत्याचार;
दोन्ही प्रकरणात सुटका आरोपी भोर तालुक्यातील साळवडे गावचा तो रहिवासी असून त्याला सात मुली आणि एक मुलगा आहे. 21 डिसेंबर 1998 रोजी त्याने एका 65 वर्षीय महिलेचा विनयभंग, तर 24 जुलै 2015 रोजी एका 17 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केले. तो 3 मे 2019 रोजी जामिनावर सुटला. 2015 च्या घटनेतील पीडितेचे वडील म्हणाले, “माझ्या मुलीच्या वेळीच याला कडक शिक्षा झाली असती तर 1 मे रोजी चिमुकलीचा जीव गेला नसता. मी साडेतीन वर्षे पाठपुरावा करूनही त्याला शिक्षा होऊ शकलेली नाही.
