गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा!:सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; 90 दिवसांत निवडणुका घेण्याचे दिले आदेश
![]()
राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, ही निवडणूक प्रक्रिया 90 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच हा नवा ट्विस्ट समोर आला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 1200 संस्थांच्या चौकशीनंतर निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या या स्पष्ट आदेशामुळे गोकुळच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर दोनच दिवसांपूर्वी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती, ज्यामागे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा एक महत्त्वपूर्ण निकाल कारणीभूत होता. सर्किट बेंचने यापूर्वी 1200 संस्थांच्या तक्रारींची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक न घेण्याचे आदेश दिले होते. या चौकशीच्या प्रक्रियेमुळे निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्याच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. सहकारी कायद्यानुसार, एखादी संस्था निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत असेल तरच तिथे प्रशासक नेमला जातो. मात्र, गोकुळचे विद्यमान संचालक निवडणूक घेण्यास तयार असतानाही प्रशासक नेमल्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी गटातील काही संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आता सर्व कायदेशीर पेच दूर केले असून, येत्या 90 दिवसांच्या आत गोकुळची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गोकुळ दूध संघाच्या संदर्भात सुरू असलेल्या 1200 संस्थांच्या चौकशीपैकी आतापर्यंत 750 संस्थांची चौकशी पूर्ण झाली असून, उर्वरित संस्थांचे काम पुढील 4 ते 5 दिवसांत संपवण्याचे नियोजन आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेला 45 दिवसांचा कालावधी गृहीत धरून, सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण प्रक्रिया 90 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे बंधनकारक केले आहे. या आदेशामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेला निवडणुकीचा मार्ग आता तांत्रिकदृष्ट्या मोकळा झाला आहे. दरम्यान, गोकुळच्या कारभारावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप आमदार शिवाजी पाटील यांच्यात तीव्र वाकयुद्ध सुरू झाले आहे. हे दोन्ही दिग्गज नेते जरी महायुतीमध्ये एकत्र असले, तरी गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावर एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी ते सोडताना दिसत नाहीत. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता, ती राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरण्याची चिन्हे आहेत.
