शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची 72 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

0
04d384fc-78c9-430a-9341-aef03ecd0734_1778067620102.jpg




पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. यापैकी एका घटनेत, सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची ६२ लाख रुपयांची फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठवला होता. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी तक्रारदाराकडून वेळोवेळी ६२ लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करून घेतले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी कोणताही परतावा दिला नाही आणि त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशाच प्रकारे, सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची १० लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे या प्रकरणाचा तपास करत आहेत. घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास दरम्यान, खराडी भागातील एका सोसायटीत सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन लाख १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे खराडीतील यशवीन ऑरीझोन सोसायटीत राहतात. त्यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याने चोरटे आत शिरले आणि शयनगृहातील कपाटातून दोन लाख १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी खरपुडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, चोरी करणारा माहितगार व्यक्ती असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed