नवले पूल परिसरात आंदोलनावर बंदी:पुणे पोलिस आयुक्तांचे आदेश, कायदा आणि सुव्यवस्थेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय

0
6f023caf-99a0-43a6-8d91-a3a9d146d139_1778041147056.jpg




मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलने करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (२ मे) सायंकाळी नवले पूल परिसरात रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे मुंबई आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक सुमारे चार तास ठप्प झाली होती. आंदोलनामुळे वाहनांच्या १५ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिका, प्रवासी आणि मालवाहू वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. अनेक नागरिक आणि प्रवाशांनी पोलिस नियंत्रण कक्षाकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. या घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुक्तांच्या आश्वासनानंतर चार तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. रात्री साडेदहानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. काही आंदोलक हटण्यास तयार नसताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून त्यांना हटवले होते. या पार्श्वभूमीवर, बाह्यवळण मार्ग आणि नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्ग हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. यापुढे नवले पूल परिसरात आंदोलन केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि आदेश धुडकावल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed