माळशेज घाटात एसटी-स्कॉर्पिओ अपघातात 4 ठार:वाहनांचा चुराडा; सर्व मृत नेवासा तालुक्यातील
![]()
मुरबाड-माळशेज घाट महामार्गावरील मृत्यूचा सापळा बनलेल्या वैशाखरे ‘ब्लॅक स्पॉट’वर (तीव्र वळण) मंगळवारी (५ मे) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एसटी बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात नेवासे तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील मामा-भाचे आणि भेंडा येथील दोन महिला अशा एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत एका अंगणवाडी सेविकेचा समावेश आहे. कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर वैशाखरे वळणाजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कॉर्पिओची समोरून येणाऱ्या एसटी बससोबत समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी प्रचंड होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. स्कॉर्पिओमधील प्रवासी आजारी नातेवाइकाला भेटण्यासाठी जात असतानाच या ‘ब्लॅक स्पॉट’वर त्यांच्यावर काळाने झडप घातली. मृतांत मामा-भाचा अविनाश काकडे, अभिषेक मोटे (दोघेही रा. वडाळा बहिरोबा), अंगणवाडी सेविका मीना कल्याण मडके (रा. भेंडा), नीता अशोक डुरे (भेंडा) यांचा समावेश आहे. टोकावडे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
