बोरगाव अर्ज येथे अंगारकीनिमित्त बारा हजार भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ:पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
![]()
फुलंब्री तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बोरगाव अर्ज येथील गिरजा नदीच्या मध्यभागी असलेल्या श्री गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त १२ हजार भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाले होते. यावेळी आलेल्या भाविकांसाठी २५१ किलोची साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली.
सकाळी ४ वाजता काकडा भजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ७ वाजता गणपतीची भव्य महाआरती करण्यात आली. आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवसभर मंदिरात अभिषेक, भजनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे थंड पाणी, वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र जागा आणि दर्शनासाठी शिस्तबद्ध रांग लावण्यात आली होती. मंदिर परिसरात नारळ, हार-फुले, प्रसाद आणि लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने मोठ्या संख्येने थाटली होती. यामुळे येथे यात्रेचे स्वरूप आले होते. सायंकाळी ७ वाजता पुन्हा महाआरती करण्यात आली. रात्री ९ वाजता परमपूज्य प्रभात गिरी महाराज यांचे प्रवचन झाले. महिलांच्या हस्ते सकाळी सामूहिक महाआरती, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम बोरगाव अर्ज येथे दर चतुर्थीला महिलांच्या हस्ते सकाळी सामुहिक महाआरती करण्यात येते. आरतीसाठी महिलांना प्राधान्य देण्यात येत असलेले राज्यातील एकमेव गणपती देवस्थान असल्यामुळे सकाळी जिल्हा भरातून महिला येथे आरतीसाठी आल्या होत्या. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
