धन्वंतरी रुग्णालयाच्या संचालक मंडळाची 17 मे रोजी निवडणूक:बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन

0
479ba22c-39c0-41b1-a061-384d56945a97_1777998902286.jpg




अमरावती येथील बडनेरा रोडवरील धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक १७ मे रोजी होणार आहे. समाजातील सामान्य नागरिकांना माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणाऱ्या या रुग्णालयाच्या संचालक मंडळाची निवड नेहमीप्रमाणे बिनविरोध व्हावी, यासाठी जुने-जानते पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. मंगळवारी (आज) माध्यमांशी संवाद साधताना पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीवर भर दिला. डॉक्टर संवर्गाच्या सर्व सहा जागा बिनविरोध झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. सहकार विभागामार्फत पाच वर्षांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार, ६ मे हा शेवटचा दिवस आहे. संस्थेच्या सुमारे २८०० आजीवन सदस्यांनी विविध मतदारसंघातून १८ उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ६ उमेदवारांविरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित १२ उमेदवारांसाठी अनेक मान्यवरांनी आपले अर्ज मागे घेण्याचे मान्य केले आहे. धन्वंतरी रुग्णालयाच्या आजवरच्या सात निवडणुकांच्या इतिहासात संचालक मंडळाची निवडणूक कधीच झाली नाही; सर्व संचालक एकमताने बिनविरोध निवडून आले आहेत. ही परंपरा यंदाही कायम राहावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. आतापर्यंतच्या आठही संचालक मंडळाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. जुन्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यावर आजीवन सदस्यांनी एकत्र येत सामोपचाराने नवे पदाधिकारी निवडायचे आणि सहकार विभागाने त्यावर शिक्कामोर्तब करायचे, अशी संस्थेची परंपरा आहे. ती कायम राखण्यासाठी यावेळीही प्रयत्न सुरू आहेत. रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे, सर्व रुग्णांसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देणे, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देणे आणि वैद्यकीय शिबिरांद्वारे जनजागृती करणे या बाबींना नव्या संचालक मंडळाचे प्राधान्य असेल, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला अशोक ठाकरे, गजानन रडके, राजेश गोयनका, प्रतापराव भुयार, ओ. जी. मुंधडा, स्वप्नील शिरभाते, प्राचार्य संजय खडसे, अरुण बांबल, अमित गावंडे, वंदना वानखडे, मिनल देशमुख या उमेदवारांसह मनपातील युवा स्वाभिमानचे नगरसेवक प्रशांत वानखडे आणि चंद्रकांत पोपट आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed