सीईओ सत्यम गांधींचा मेळघाटात पहिला दौरा:पाणीपुरवठा, मनरेगा कामांची पाहणी; अधिकाऱ्यांना कठोर सूचना
![]()
अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपला पहिला दौरा मेळघाट परिसरात केला. या दौऱ्यात त्यांनी पाणीपुरवठा आणि मनरेगाच्या कामांबाबत कठोर भूमिका घेत, कामचुकार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सीईओ गांधी यांनी मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमधील काही गावांना भेटी दिल्या. त्यांनी ग्रामस्थ तसेच स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जलजीवन मिशन, पाणीटंचाई निवारण, लघुसिंचन आणि ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकासकामांचा त्यांनी सखोल आढावा घेतला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, अपूर्ण योजनांना गती देणे आणि कामांची गुणवत्ता तपासणे यावर त्यांनी भर दिला. परतवाडा येथून धारणीकडे जाताना त्यांनी कोहाना आणि बिहाली ग्रामपंचायतींना भेट दिली. त्यानंतर सेमाडोह मार्गे माखला येथे पोहोचून आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली. सेमाडोह उपकेंद्रातील इन्व्हर्टर चार्ज होत नसल्याचे निदर्शनास येताच, त्यांनी तातडीने बॅटरी बदलण्याचे निर्देश दिले. याच गावातील अंगणवाडीतील बंद टीव्ही दुरुस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ग्रामपंचायतीत नागरिकांना बोलावून जलजीवन मिशन अंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनेबाबत संवाद साधण्यात आला. पाणीपुरवठा अपुरा असल्याने पर्यायी व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, सुधारित प्रशासकीय मान्यता प्रलंबित असलेल्या पाण्याच्या स्रोताचे अपूर्ण काम, दानपत्र प्राप्त झालेल्या ठिकाणी त्वरित सुरू करण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. टेमभूरढाणा येथे १५ व्या वित्त आयोगातून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम दोन दिवसांत ट्रायल घेऊन पुढील पाच दिवसांत स्टँडपोस्ट उभारून सुरू करण्याचे निर्देश ग्रामपंचायतीला दिले. आशा सेविकेचे रिक्त पद १५ दिवसांत भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ग्रामस्थांनी शेतवस्तीसाठी रस्ता व सिंचन तलावाची मागणी केल्याने संबंधित विभागांना सर्वेक्षण व अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. चिखली ग्रामपंचायतीतील भिलोजा येथील सिंचन तलावाचीही पाहणी करण्यात आली. तारूबांदा ग्रामपंचायतीतील राक्षा येथे भेट देऊन घरगुती नळ जोडणी तपासताना, स्रोतापासून टाकीपर्यंतची जुनी पाईपलाईन बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. राक्षा फाटा ते गाव रस्त्याबाबतही कारवाईचे आदेश त्यांनी दिले. या दौऱ्यात चिखलदरा व धारणीचे गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा व सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, तालुका आरोग्य अधिकारी आणि संबंधित सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. आढाव येथे पाणीपुरवठा योजनेची तपासणी करताना सीईओ गांधी यांनी स्वतः टॅब उघडून माहितीची खात्री केली. आढाव येथे एक दिवसाआड पाणी मिळत असल्याचे समोर आल्यानंतर, त्यांनी दररोज सकाळी पाणीपुरवठा करणे आणि टाकीची दुरुस्ती ग्रामपंचायतीमार्फत करण्याच्या सूचना दिल्या. निधीअभावी अडचण आल्यास जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यासही सांगण्यात आले.
