राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा:वकील असीम सरोदे यांची मागणी; 'नसरापूर'च्या आरोपीला हालहाल करून मारण्याच्या मागणीवर आक्षेप
![]()
वकील असीम सरोदे यांनी नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालहाल करून मारण्याची मागणी करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आरोपीला ठेचून मारा, हालहाल करून मारा, अशा मागण्या करणे म्हणजे समाजात बेकायदेशीरता पसरवण्याचा प्रयत्न आहे. त्यातून लोकांना गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे पोलिसांनी एकतर संबंधितांना समज द्यावी किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी म्हटले आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील एका 4 वर्षीय चिमुकलीवर एका 65 वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अभिनेते प्रवीण तरडे यांनीही या प्रकरणी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. विशेषतः राज ठाकरे यांनी आरोपीला हालहाल करून संपवण्याची मागणी केली. नेमक्या याच मागणीवर वकील असीम सरोदे यांनी आक्षेप घेतला आहे. एका घटनेसाठी कायदा बाजूला ठेवता येणार नाही – सरोदे असीम सरोदे एका ऑनलाईन मराठी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले, भोर अत्याचार प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसार 100 टक्के फाशीची शिक्षा होईल. पण ती होण्यापूर्वीच त्याचा चौरंग करा, त्याला हालहाल करून संपवा, अशी बेकायदेशीर मागणी करणारे अभिनेते प्रवीण तरडे व राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पोलिसांनी बोलावून समज दिली पाहिजे किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण, कायदा हा एखाद्या घटनेसाठी बनवला गेला नसतो, तर तो चिरंतन असतो. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्या घटनेपुरता कायदा बाजूला ठेवून वागावे आणि नंतर पुन्हा लोकशाहीने वागावे असे सोयीनुसार करता येत नाही. अजमल कसाबसारख्या राक्षसी प्रवृत्तीच्या गुन्हेगारालाही भारत सरकारने सरकारी वकील देऊन त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. नंतर त्याला कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्यात आली. कोणत्याही आरोपीला अगोदर त्याचे म्हणणे मांडू द्यायचे आणि नंतर कायद्यातील तरतुदींनुसार त्याला शिक्षा द्यायची ही जगभरात रूढ झालेली व्यवस्था आहे. त्यानुसार भोर प्रकरणातही झाले पाहिजे. या गुन्ह्यातील आरोपीला कायद्याने कठोर शिक्षा होईल व त्याला फाशीच होईल यात आम्हाला तरी कोणतीही शंका नाही, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे. अभिनेते प्रवीण तरडेंच्या भूमिकेवरही आक्षेप असीम सरोदे यांनी अभिनेते प्रवीण तरडे यांनी या प्रकरणी व्यक्त केलेल्या भूमिकेवरही आक्षेप घेतला. ते म्हणाले, प्रवीण तरडे चे या व्हिडीओ मधील वक्तव्य अत्यंत चुकीचे, बेकायदेशीरता वाढविणारे आणि कायद्याची प्रक्रिया सगळ्यांनी झुगारून द्यावी यासाठी उद्युक्त करणारे आहे. नरसापूर प्रकरणातील आरोपीने अमानुष कृत्य केले आहे व त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून कठोरतम अशी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मीच नाही तर माझ्यासारखे हजारो वकील काम करतील. पण प्रवीण तरडे आमच्यासोबत आयएलएस कॉलेज मधून लॉ चे शिक्षण घेतलेला आहे. त्याने केवळ भावनांवर आधारित बेकायदेशीरता वाढविणारे विधान करावे हे धक्कादायक आहे. वाढीव एककल्ली माहिती प्रसारित करणारे ऐतिहासिक सिनेमे करून करून प्रवीणच्या कदाचित हे लक्षात येत नाहीये की आपण आता राजेशाही व्यवस्थेत नाही. कायद्याच्या नियमांचे राज्य स्विकारलेल्या भारतात चौरंग करणे इत्यादी बोलतांना आकर्षक वाटणाऱ्या संकल्पना आपण राबवू शकत नाही व तसा हिंसेखोरपणा पसरविणे म्हणजे गुन्ह्यांना प्रोत्साहन देणे ठरते याची जाणीव प्रवीणने ठेवावी.बलात्कार करणाऱ्या कांबळे या नराधमाला यापूर्वी काही वेळा सोडण्यात आले तेव्हा पोलीस, सरकारी वकील, न्यायव्यस्थेतील अधिकारी सगळ्यांच्या काय काय सामूहिक चुका झाल्यात त्याचे विश्लेषण करून आता तरी या लिंगपिसाटला कठोरतम शिक्षा व्हावी यासाठी आम्ही काम करू, असे ते म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? राज ठाकरे नसरापूर घटनेवर संताप व्यक्त करताना म्हणाले होते, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात साडेतीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं. नंतर तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला व भयानक चीड आली असून या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं. सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्टट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. असं नाहीये की ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे., याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
