मे महिन्याच्या ग्रामसभेत जनगणना, पाणीटंचाईवर होणार चर्चा:सीईओ गांधींनी परिपत्रक काढले, स्व-गणनेवर विशेष लक्ष

0
b179246f-d3b1-4853-b455-3fdad1fc2d65_1777999424801.jpg




जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मे महिन्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या ग्रामसभांमध्ये जनगणना आणि संभाव्य पाणीटंचाई या दोन महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. पंचायत विभागामार्फत हे परिपत्रक सर्वदूर पाठविण्यात आले आहे. भारत सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र दिनापासून सुरुवात झाली आहे. नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा आणि तीही ऑनलाईन पद्धतीने करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे ग्रामसभांमध्ये या प्रक्रियेबद्दल नागरिकांना सविस्तर माहिती दिली जाईल आणि जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले जाईल. यामुळे जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ, जलद व पारदर्शक होण्यास मदत होईल. याशिवाय, मान्सूनपूर्व काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हा मुद्दाही ग्रामसभेत चर्चेला येणार आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आवश्यकता आहे की नाही, याबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात येतील आणि त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. सीईओंच्या मते, ग्रामसभांमधून स्थानिक गरजांचा आढावा घेऊन नागरिकांच्या सहभागातून ठोस निर्णय घेतले जावेत. पूर्वी मे महिन्याच्या पहिल्या दिवशी येणाऱ्या महाराष्ट्रदिनी सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेतली जायची. मात्र, आता १ मे ऐवजी सोयीनुसार त्या-त्या ग्रामपंचायतींनी मे महिन्यात केव्हाही ग्रामसभा घ्यावी, असा बदल करण्यात आला आहे. सीईओंच्या परिपत्रकातही तसा उल्लेख करण्यात आला आहे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि २ ऑक्टोबर या दिवशीच्या ग्रामसभा मात्र निर्धारित दिवशीच होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed