फडणवीसांचे राक्षसी वृत्तीचे सरकार आपटावेच लागेल:राज्यातील गुन्हेगारीवरून मनोज जरांगेंची टीका, बंगालच्या निकालावरही संशय व्यक्त

0
new-project-2026-05-05t164440718_1777979719.jpg




देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयावरून विरोधकांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला असतानाच, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या या यशावर संशय व्यक्त केला आहे. याचवेळी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून, हे राक्षसी वृत्तीचे सरकार खाली आपटावेच लागेल, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अकलूज येथील सकल मराठा मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांच्या आईच्या निधन झाले. मनोज जरांगे यांनी नुकतीच धनाजी साखळकर यांचे सांत्वन करण्यासाठी नुकतेच त्यांच्या घरी गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी देशातील राजकीय परिस्थिती आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर सविस्तर भाष्य केले. फडणवीसांचे सरकार आपटावेच लागेल राज्यातील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला. सध्या राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून, आपल्याला असे ‘रत्न’ लाभले आहेत की त्यांच्या राजवटीत गुंडांना तुरुंगातही एसी आणि मोबाईल फोनसारख्या व्हीआयपी सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. या सरकारमध्ये केवळ गुंडांचेच चालणार असून, हे फडणवीसांचे सरकार राक्षसी वृत्तीचे आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आता हे सरकार आपटावेच लागेल, असा उद्वेग त्यांनी यावेळी व्यक्त केला. बंगालच्या निकालात नक्की काहीतरी भानगड पाच राज्यांच्या निवडणूक निकालांवर, विशेषतः पश्चिम बंगालमधील भाजपच्या द्विशतकी विजयावर शंका उपस्थित करताना मनोज जरांगे म्हणाले की, ज्याला विचारले ते म्हणतो मी यांना मतदान केले नाही, तरी हे जिंकतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बाईला पाडले, पण लोक म्हणतात ममताबाई कधीच पडणार नाही. मला पहिल्यांदा वाटायचं काही नसेल, पण आता नक्की काहीतरी भानगड आहे, त्यांनी कुठेतरी काड्या खोचून ठेवल्या आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. विरोधकांच्या सुरात सूर पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या अनपेक्षित पराभवानंतर आणि भाजपने मिळवलेल्या एकहाती सत्तेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह स्वतः ममता बॅनर्जी यांनी भाजपवर मतचोरीचा आणि ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला होता. आता याच सुरात सूर मिळवत मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या निवडणूक प्रक्रियेतील विजयावर शंका घेतल्याने आणि राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed