मनपा आयुक्तांकडून नवीन पाणीपुरवठा योजनेची पाहणी:अपघातांची वाट न पाहता कामे पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश




छत्रपती संभाजीनगर येथील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी (२३ जून) सकाळी १० वाजता प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि अपघातांची वाट न पाहण्याचे कडक निर्देश दिले. विशेषतः, खोदलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. वाहेगाव येथील भीमाशंकर विद्यालयासमोर रस्त्यावर असलेल्या एअर व्हॉल्व्हमुळे अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले. एनएचएआयने बॅरिकेडिंगसाठी स्वतंत्र निविदा काढली असली तरी, काम पूर्ण होईपर्यंत तात्काळ ‘रेडियम’ लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. नाथ सीड्ससमोरील पाणी योजनेसाठी खोदलेल्या अर्धवट रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी कामाचा आढावा घेत अप्रोच चॅनलसाठी त्वरित खोदकाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सध्या ७५ अश्वशक्तीचे दोन फ्लोटिंग पंप बसवण्यात आले असून, त्याद्वारे ५० एमएलडी पाणी उपसा सुरू झाला आहे. पाण्याची गरज आणि कामाचा वेग लक्षात घेता, आयुक्तांनी आणखी दोन पंप तातडीने लावण्याचे आदेश दिले. रस्त्यात अडथळा ठरणारे असे किती व्हॉल्व्ह आहेत, याचा तातडीने अपडेट देण्याच्या सूचना केल्या. शुगर फॅक्टरीसमोरील एअर व्हॉल्व्हचे काम गेल्या दोन महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली व पावसाळ्यापूर्वी व्हॉल्व्हचे सर्व उरलेले काम पूर्ण करण्यास बजावले. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांसोबत कार्यकारी अभियंता वसंत भोये, ए. बी. देशमुख यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *